Type Here to Get Search Results !

महागांव नगरपंचायतीचा कारभार प्रश्नचिन्हात, दिवे बंद, गाड्या धूळखात नागरिकांचा संताप उफाळला



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र

महागाव वार्ड क्रमांक ११ सह शहरातील अनेक वॉर्डमध्ये रस्त्यावरील लाईट दिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. संध्याकाळ होताच अंधाराचे साम्राज्य पसरत असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे नगरपंचायतीत सध्या सते मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा आणि नगरसेवक सत्तेत असताना देखील या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सत्ता बदलली, पण परिस्थिती नाही, असा बोचरा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही लाईट दुरुस्ती होत नसल्याने रात्री अपघात आणि गैरप्रकारांची भीती वाढली आहे.याचबरोबर नगरपंचायतीच्या आवारात कचरा गाड्या, गटार स्वच्छतेची मशीन, रुग्णवाहिका आणि अग्निशामक गाडी धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे. लाखो रुपयांची साधनसामग्री वापराऐवजी निष्क्रिय ठेवली जात असल्याची चर्चा रंगली आहे. साहित्य आहे, पण वापर नाही मग विकास नेमका कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाहेरगावावरून महागावांत स्थायीक झालेल्या व्यक्ती नगराध्यक्षा केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा देखील सुरू आहे. स्थानिक प्रश्नांची जाणीव नसलेले नेतृत्व शहराचा विकास कसा करणार? अशी टीका काही नागरिकांनी केली.

दरम्यान, यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित घोटाळ्याच्या चर्चाही पुन्हा रंगू लागल्या आहेत. काही नागरिकांकडून माजी पदाधिकाऱ्यांवर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले जात आहेत. तसेच एका प्रतिनिधीच्या २५ हजार रुपये एका पत्राचे बिलाबाबतही शहरात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सर्व बाबींवर अधिकृत खुलासा झालेला नाही.

यासोबतच संपूर्ण महागांव शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. गटारे तुंबलेली, साचलेले पाणी आणि नियमित फवारणीचा अभाव यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे.

 नगरपंचायतीने तात्काळ संपूर्ण शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगरपंचायतीतील सत्तांतरानंतर मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र मूलभूत सुविधा रस्त्यावरील दिवे, स्वच्छता व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणा आणि डास नियंत्रण याच प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.


आता सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकीय शक्ती प्रदर्शन न करता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अन्यथा जनतेचा रोष आगामी निवडणुकांत दिसून येईल, असा इशारा नागरिक देत आहेत. महागावकरांना घोषणांपेक्षा कृती हवी आहे आणि तीही तात्काळ.


Post a Comment

0 Comments