Type Here to Get Search Results !

करंजखेड महागांव मार्गाची चाळण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा उघड



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे 

महागांव : करंजखेड ते महागांव या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अवघ्या पाच किलोमीटर अंतरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्ता की खड्ड्यांचे जाळे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.अवकाळी पावसाच्या काही सरींनीच डांबरीकरणाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे झाकले गेल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच भीषण बनत असून अनेकदा वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होत आहेत. वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांना दुखापतींचे प्रकार वाढले आहेत.

या मार्गावर सुमारे दहा गावांतील नागरिकांचे दररोज येणे-जाणे सुरू असते. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णांना या रस्त्यावरून महागावला जावे लागते. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा प्रवास म्हणजे जणू जीवावरचा उद्योग ठरत आहे. दोन वाहने समोरासमोर आली की खड्डा चुकवताना दुसऱ्यात वाहन अडकते, अशी अवस्था झाली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे आणि अरुंद झालेला मार्ग अपघातांना आमंत्रण देत आहेत. तरीही संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

विशेष म्हणजे या मार्गावरील पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुलावर पुन्हा तडे आणि खड्डे पडू लागले आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निधी खर्च होतो, पण दर्जेदार काम होत नाही, अशी टीका नागरिकांतून व्यक्त होत आहे.

रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, झुडपे काढावीत आणि पुलाची दर्जेदार पुनर्बांधणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

प्रशासनाने करावयाच्या तातडीच्या उपाययोजना :

संपूर्ण पाच किलोमीटर मार्गाची तात्काळ तांत्रिक पाहणी करून खड्ड्यांचे सर्वेक्षण करणे.केवळ डांबर टाकून तात्पुरती मलमपट्टी न करता, मजबुत बेस तयार करून कायमस्वरूपी डांबरीकरण करणे.पुलाच्या कामाची स्वतंत्र गुणवत्तापरीक्षण (क्वालिटी ऑडिट) करून निकृष्ट कामावर जबाबदारांवर कारवाई करणे.

रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे आणि अडथळे तातडीने हटवून मार्ग रुंद करणेअपघातप्रवण ठिकाणी परावर्तक (रिफ्लेक्टर), चेतावणी फलक व स्पीड ब्रेकर बसविणे.पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी दुरुस्तीचा ठोस आराखडा जाहीर करून कामाची वेळमर्यादा निश्चित करणे.काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून दर्जाची खात्री करणे.रस्ता सुरक्षित आणि सुकर करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून तातडीने ठोस कारवाई करावी


Post a Comment

0 Comments