Type Here to Get Search Results !

बाळदी ग्रामपंचायतीत संतापाचा स्फोट!



 बदली धोरण धाब्यावर बसवून ग्रामसेवकाचा ‘दीर्घ’ मुक्काम; ग्रामस्थांचा प्रशासनाला थेट इशारा


 *प्रविन कुंटे उमरखेड  प्रतिनिधी *


उमरखेड (जि. यवतमाळ ) | 

उमरखेड तालुक्यातील बाळदी ग्रामपंचायतीत सध्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी उसळली असून ग्रामस्थांनी ग्रामसेवक श्री. डी. बी. सूर्यवंशी यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. शासनाच्या बदली धोरणाला हरताळ फासून एकाच ठिकाणी तब्बल पाच वर्षे कार्यरत राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या दि. 28 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांच्या बदलीसाठी ठरावीक कालमर्यादा व निकष निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, संबंधित ग्रामसेवक चार वर्षे प्रभारी पदावर आणि एक वर्ष कायमस्वरूपी पदावर कार्यरत राहिल्याचे नमूद करत ग्रामस्थांनी या प्रकरणात स्पष्टपणे बदली धोरणाचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे.

ग्रामस्थांच्या निवेदनात ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता, नागरिकांच्या शासकीय कामांमध्ये होत असलेला विलंब, आर्थिक व्यवहारांबाबत निर्माण झालेल्या शंका तसेच पारदर्शकतेचा अभाव यांसारख्या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले असून प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित ग्रामसेवकाची बदली करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, काही बाबीं संदर्भात व्हिडिओ पुरावे असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून आवश्यक ते पुरावे प्रशासनासमोर सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

सदर निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी उमरखेड तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

शासन निर्णय स्पष्ट असताना त्याची अंमलबजावणी का झाली नाही, एकाच अधिकाऱ्याला वारंवार मुदतवाढ कशी मिळाली, आणि स्थानिक पातळीवरील तक्रारींकडे दुर्लक्ष का झाले, असे सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शासन निर्णयानुसार तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

बाळदी ग्रामपंचायतीतील हा वाढता असंतोष आता प्रशासनासाठी गंभीर परीक्षा ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Post a Comment

0 Comments