पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी अटकेत
यवतमाळ प्रतिनिधी
घाटंजी:-शिक्षक हा ज्ञान संस्कार आणि सुरक्षिततेचा आधार असतो मात्र याच पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली असून मुख्याध्यापकाने सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
किशोर मालवीय वय ५० राहणार यवतमाळ असे संशयित मुख्याध्यापकाचे नाव आहे. ५ फेब्रुवारी गुरुवारला या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला 'मी तुला फोन करेन, तू मला रात्री बस स्थानकावर येऊन भेट' घरी सांगितल्यास तुला मारून टाकीन, असे धमकावले होते. त्यानुसार रात्री ११ च्या सुमारास त्याने फोन करून विद्यार्थिनीला बोलाविले. तिथे हा नराधम चार चाकी वाहनात बसलेला होता. त्या वानातच त्या मुलीला त्याने जबरीने बसविले व वाहनातच त्याने तिच्यावर अत्याचार केला. रात्री उशिरा घरी परतल्यावर पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर मोबाईल मधील कॉल रेकॉर्डिंग मुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या संदर्भात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिनांक ७ रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यात मुख्याध्यापक मालवीय हा शाळेत कार्यरत असताना दारूच्या नशेत राहत होता. तसेच शाळेतील एका अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील हावभाव व चुकीच्या पद्धतीने इशारे करत असतो, असेही लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस करत नागपूर व यवतमाळ येथे शोध मोहीम राबवली आणि अखेर यवतमाळ येथील निवासस्थानी त्याला अटक केली. साहेब पोलीस निरीक्षक सचिन राठोड, प्रवीण तालकोतुलवार यांनी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की तक्रारच गुन्हेगारांना रोखू शकते, नुकताच एका प्रतिष्ठित तंत्रनिकेतन महाविद्यालयातही विद्यार्थिनीशी छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र त्या प्रकरणात तक्रार दाखल न झाल्याने तो प्रकार दडपला गेला. अशाच प्रकारे अनेक घटना केवळ भीती, बदनामी, धास्ती किंवा सामाजिक दबावामुळे पुढे येत नाहीत आणि गुन्हेगार निर्धास्तपणे मोकळे फिरत राहतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "अशा घटनांना आळा घालायचा असेल तर मुलींनी धैर्याने पुढे येणे आणि पालकांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. तक्रार दाखल झाली तरच कायद्याची चक्र फिरतात आणि दोषींवर कठोर कारवाई शक्य होते. गप्प बसणे म्हणजे गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठबळ देण्यासारखे आहे, "असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. शाळा महाविद्यालय आणि ग्रामीण भागात पोस्को कायदा व महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याची गरज असून, शिक्षण विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले..

Post a Comment
0 Comments