आधई हा शब्द माय मराठीच्या बोलीतील आहे.कारण गाव व विभागानुसार तेथील निकडीतून अश्या या शब्दांची निर्मिती होते.लिखाण स्वरूपात हे शब्द आढळत नसले तरी,बोलीत वापरले जातात.आधई हा शब्द मराठीतील अर्धा या शब्दांपासून तयार झाला असावा त्याचप्रमाणे हिंदीचाही वापर आधईमध्ये दिसून येतो. अर्थात आधा पासून आधई,परंतु हिंदीतील आधी म्हणजे अर्धी बकरी असाही होऊ शकतो.पाळण्यासाठी घेतलेल्या बकरीसाठी कुठेतरी हे जुळतं. कारण एक व्यक्ती बकरी विकत घेऊन पाळणाऱ्याला देते व त्यावर त्यांचाही अर्धा अधिकार असतो.अन हो! मराठीत आधीची बकरी म्हटले तर,साध्या भाषेत अगोदरची बकरी असेही होऊ शकतं आणि आधी बकरी हिंदीत म्हटलं तर अर्धी बकरी असेही होतं होऊ शकतं.परंतु आधी म्हटलं तर बोलायला अन ऐकायला फारसं विशेष वाटत नाही म्हणून, आधीचा अपभ्रश होऊन आधई प्रचलित झाला असावा व बकरी स्त्रीलिंग असल्यामुळे तो जुळूनही आला.
एका व्यक्तीकडून बकरीचे पालनपोषण करण्यासाठी घेतलेल्या दुसऱ्या व्यक्तीने बकरीपासून मिळणारे भविष्यातील उत्पन्न समप्रमाणात वाटप करून घेण्याच्या क्रियेला आधईची बकरी असे म्हणतात.आमच्या गावाकडे या बकरीला पालनपोषणासाठी घेतलेल्या क्रियेला आधईची बकरी हा शब्द प्रचलित आहे. कदाचित!इतर गावांमध्ये किंवा विभागानुसार जसे की,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, कोकण किंवा मुंबईकडील भागात याला वेगवेगळी नावे असू शकते मात्र,पालनपोषणाचे व व्यवहाराचे स्वरूप जवळपास सारखेच असेल कारण,पूर्वी गावोगावी शेतीबरोबर पशुपालन,शेळीपालन हा जोडधंदा करायचे.एक एकर,दोन एकर शेतीवाले शेतकरी हे शेळीपालन किंवा काही शेतीपूरक जोडधंदा करायचेच किंवा आधईची बकरी यासारखे जोड व्यवसाय करायचे.यामध्ये दोघांचाही फायदा व्हायचा.जसे की,एखादा व्यक्तीकडे पैसा पुरेसा आहे मात्र वेळ नाही आणि एखाद्याकडे पुरेसा वेळ आहे.जागा आहे मात्र शेळी,बकरी विकत घेण्यास पैसे नाहीत म्हणून,ज्याच्याकडे पैसे आहे पण, बकरी पाळण्यास वेळ नाही असा व्यक्ती बकरी पाळणाऱ्यास बकरी विकत घेऊन देत असे.किंवा जास्त पैसे असल्यास अनेक बकऱ्या विकत घेऊन देत असे.
खेड्यापाड्यात हे व्यवसाय लोकांचे आपापसात अगदी विश्वासाच्या नात्यावर चालायचे.त्याचे कुठले एग्रीमेंट ना बॉण्डपेपर असायचे. केवळ एकमेकांप्रती असलेला विश्वास.या विश्वासाचा जोरावर खेडयातील लोक हजारो रुपयांचा व्यवहार आणि व्यवसाय करतात.मात्र या व्यवहारांमध्ये कुणा एकाचा फायदा तर कुणाचे नुकसान होईल असं मुळीच नसतं.दोघांचाही सारखाच फायदा होईल अशी प्रेमळ आणि पारदर्शक रचना असते.खेड्यातील लोकं अशिक्षित,निरक्षर जरी असले तरी या धोरणांमध्ये त्यांची तल्लख बुद्धिमत्ता दिसून येते.दोघांचेही हित दिसून येते.लुबाडणे हा त्यांचा हेतूच नसतो म्हणून या आधईच्या बकरी सारख्या छोट्या व्यवसायातून खेड्यातील कितीतरी कुटुंबांची प्रगती झालेली दिसून येते.घर-संसार लेकरबाळं यांचे पालन-पोषण अगदी व्यवस्थित होताना दिसून येते.कारण यामध्ये दोन्ही व्यक्तीचा एकमेकांप्रती असलेला विश्वास व प्रामाणिकपणा दिसून येतो.समजा एखाद्या व्यक्तीला शेळी पालन करायचे आहे.त्याच्याकडे बकरी,शेळी घेण्या विकत घेण्यास पैसा आहे मात्र,त्याच्याकडे पालनपोषण करण्यास वेळ नाही, म्हणून तो एका भूमीहीन शेतकरी मित्राला बकरी पाळण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीस एक बकरी घेऊन देतो. बकरी साधारण एका वर्षातून दोन वेळेस पिल्लांना जन्म देते. साधारण एकापेक्षा जास्त अर्थात एक वेळेस दोन किंवा जास्तीत जास्त चार पिल्लांना पण जन्म देते. ज्यावेळेस बकरी विकतघेणारा व्यक्ती पालन करणाऱ्यास बकरी विकत घेऊन देतो तेव्हापासून त्याची जबाबदारी बनते.सकाळपासून संध्याकाळपर्यंत पालन पोषण व तिची देखभाल घेतो जसे की, गोठ्यातील साफसफाई, आवश्यक गवत, चारापाणी वगैरे सर्वकाही त्याच्याकडे असते.बकरीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर उदा.दोन पिल्लांना जन्म दिल्यास त्यातील एक पालन कर्त्याचे व दुसरे बकरीच्या मूळ मालकाचे असते. त्यापैकी स्त्रीलिंगी बकरी व बोकड म्हणजे पुल्लिंगी बोकड ते आपापसात ठरवतात की त्यातील कोणते कोणाला घ्यायचे.तो त्यांचा सामंजस्याचा भाग असतो. गणित न जुळल्यास दोन्ही विकून त्यातील मिळणारे पैसे समप्रमाणात वाटून घ्यायचे.असं अगदी साधं -सोपं गणित असतं.
सर्वसाधारणपणे बकरीचे पिल्लं लहान असतात, तेव्हा बकरीचे दूध काढत नाही मात्र, पिल्लं मोठे झाल्यास अर्थात दोन ते तीन महिन्याचे झाल्यास चहापाण्यासाठी काढतात.बहूतांश प्रमाणात गाई म्हशीचे दूध वापरतात, मात्र बकरीचे दूध हे गुणकारी असतं. जर एखाद्यावेळेस उन्हाळ्यात ऊन लागलं तर आई तळपायाला व डोक्याला बकरीचे दूध लावायची. त्यामुळे होणारा त्रास कमी व्हायचा.अशा पद्धतीने आधईच्या बकरीला झालेले पिल्लं ते एक, दोन किंवा त्यापेक्षा अधिक असले तरी,त्यांचा समप्रमाणात अधिकार हा पालनकर्त्याचा व बकरीच्या मूळ मालकाचाअसतो.आधईच्या बकरीचा साधा हिशोब व गणित असं की,बकरीने पिल्लांना जन्म दिल्यानंतरही तिच्या पालनपोषणाची जबाबदारी ही पालनकर्त्याकडेच राहते.त्यामध्ये विशेषता लहानपिलांना सकाळी दूध पाजणे,त्यांना रामूनीच्या काड्यापासून किंवा बांबू पासून बनवलेल्या डाल्याखाली झाकून ठेवणे, कारण ते जोपर्यंत छोटे असतात त्यांची भटक्या कुत्र्यांपासून काळजी घ्यावी लागते.अन्यथा ते त्यांच्यावर हल्ला करू शकतात. अर्थात त्यांची काळजी घेणे ही पालनकर्त्याचे कार्य असते.जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत किंवा भविष्यात त्यांना बाजारात विकायला नेईपर्यंत..!
बकरीपासून शेती उपयोगी पिकासपूरक गावरान खत मिळते.तेसुरुवातीला लेंडी स्वरूपात असते.त्यानंतर ते कुजून त्याचे पिकास पोषक असे गावरान खत तयार होते.मात्र यावर पालनकर्त्याचा अधिकार असतो,कारण तो गोठ्यातील मलमूत्र साफ करतो.झाड-लोड करतो आणि विशेष म्हणजे ते पालनपोषण त्याच्या गोठ्यात किंवा जिथे बकऱ्या बांधलेल्या असतात तिथेच होते त्यामुळे ते इकडून-तिकडे हलवता येत नाही म्हणून साधारण बकरी पासून मिळणाऱ्या गावरान खतावर पालनकर्त्याचा अधिकार असतो.काही दिवसानंतर मूळ मालकास बकरीचे दूध हवे असल्यास,पालनकर्ता देऊ शकतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकाचा कडक करार नसतो.केवळ मैत्रीपूर्ण संबंध हाच करार असतो.साधारणपणे या सहा महिन्याच्या कालावधीत पिल्लं मोठे होतात.ठरलेल्या शब्दाप्रमाणे मूळ मालक पिल्लं घेतो.त्यांना बाजारात विकतो किंवा परत त्यांच्याकडेच आधईसाठी देतो.त्यातील महत्त्वाचा विषय असा की स्त्रीलिंगी बकरी पाट हीच परत आधईने देऊ शकतो मात्र बोकड नाही...!बोकडांना बाजारात विकल्या जाते.त्यांचा बळीच दिला जातो.असो! अशी ही रचना मानवतेच्या दृष्टीने बघितली तर भयंकर आहे.मात्र व्यवसायाच्या दृष्टीने बघितल्यास कित्येक लोकांचे जीवन त्यावर अवलंबून आहे.अशा प्रकारे या समान वाटाघाटीनंतर बकरी पुन्हा गर्भार राहिल्यास त्याची पुढील व्यवहारप्रक्रिया ही अगोदर ठरल्या प्रमाणेच असते.
अशाप्रकारे खेड्यापाड्यातील अगदी साध्या-सोप्या हिशोबाचा आणि गणिताच्या या आधईच्या या बकरीच्या व्यवसायातून गोरगरीब, मेहनती लोक तथा ज्यांच्याकडे शेतीवाडी नाही अश्यांनी जिद्द, मेहनत व संघर्षातून प्रगती केली.एका बकरीपासून अनेक बकऱ्या वाढवल्या.त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्च भागण्यास कुटुंबाला आधार दिला.एका बाजूला बकरीच्या मूळ मालकालाही काही न करता किंवा पैशाच्या जोरावर उत्पन्नास चालना मिळते. यातून दोघांचेहि हित साधण्यास मदत होते.मान्य आहे,आधईची बकरी हा अगदी छोटा विषय आहे मात्र, विचार केल्यास बराच काही आहे. कारण त्यातून खेड्यातील भोळ्या भाबड्या लोकांच्या एकमेकांप्रती असलेल्या विश्वासाचे व प्रामाणिक व्यवहाराचे दर्शन घडते.अन्यथा या शहरी व नागरी भागातील बेगडी, औपचारिक जीवन पद्धतीतून विश्वास, प्रामाणिकपणा लयास जातांना दिसून येत आहे.अजूनही हे केवळ खेड्यातच बघायला मिळते.अशा या गावाकडील एकमेकांच्या सहकार्यातून सुरु केलेल्या छोट्या-छोट्या उद्योगातून व्यवसायास चालना मिळते.त्यातून गोर-गरीब लोकांना आर्थिक बळकटी मिळते पर्यायाने गावातील लोकांचा एकोपा टिकून राहतो.हेच तर खरं खेड्यातील वैशिष्ट्यपूर्ण जीवन आहे.
विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा
Post a Comment
0 Comments