; जिवे मारण्याची धमकी वडिलोपार्जित जागेवरून वाद चिघळला; गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव तालुक्यातील वाकान गावात एका आदिवासी विधवा महिलेला तिच्याच घरात घुसून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पीडित महिलेने महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. कांता गजानन शिंदे (वय अंदाजे ४५) या आपल्या मुलासह वडिलोपार्जित जागेवर वास्तव्यास आहेत. त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मात्र २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास गावातीलच काही व्यक्तींनी संबंधित जागेवरून वाद निर्माण करत थेट त्यांच्या घरात घुसून गोंधळ घातला.
तक्रारीनुसार, भिमा मंगु राठोड, संतोष मंगु राठोड, संजय मंगु राठोड व मुन्ना संजय राठोड (सर्व रा. वाकान) यांनी महिलेच्या घरात घुसून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. यावेळी महिलेचे केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच “जागा सोडली नाही तर तुला व तुझ्या मुलाला जिवे मारू” अशी थेट धमकी देण्यात आली. घरातील टिनपत्रे व संसारोपयोगी साहित्य फेकून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
वडिलोपार्जित मालमत्तेवरून वादसदर जागा ही संबंधित महिलेची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचे कागदोपत्री पुरावे असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी महिलेच्या मामाने ओळखीच्या व्यक्तीस तात्पुरते राहण्यासाठी जागा दिली होती. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जागा इतरांना विकल्याची माहिती पुढे आली. यानंतर पीडित महिला पुन्हा आपल्या जागेवर राहण्यासाठी आल्याने हा वाद उफाळल्याचे समोर येत आहे.
ग्रामीण भागात वाढते जमीन वाद आणि महिलांची असुरक्षितताया घटनेमुळे ग्रामीण भागात वाढत चाललेले जमीनविषयक वाद आणि त्यातून निर्माण होणारी कायदा-सुव्यवस्थेची समस्या अधोरेखित झाली आहे. विशेषतः विधवा व आदिवासी महिलांवर होणारे अत्याचार ही चिंताजनक बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कारवाईची मागणी; पोलिसांकडे तक्रारपीडित महिलेने महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित चारही व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणात पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून पीडितेला संरक्षण देणे आवश्यक असल्याची मागणीही पुढे येत आहे.
वाकान येथील ही घटना केवळ एक वाद नसून ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. जमीन वादाच्या नावाखाली महिलांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा घटना वाढण्याची भीती नाकारता येत नाही.

Post a Comment
0 Comments