प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
जीवघेण्या हल्ल्यानंतरही ‘ॲक्शन मोड’ कायम; महागांवात खाकीचा दरारा वाढला
महागांव :कर्तव्यापुढे कोणतीही भीती टिकत नाही, याचा प्रत्यय महागांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे यांच्या कामगिरीतून पुन्हा एकदा आला आहे. अवैध वाळू उपसा रोखताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही अंभोरे यांनी हार न मानता पुन्हा मैदानात उतरत रेती माफियांना थेट आव्हान दिले आहे.
वाकोडी घाटावरील थरारक घटना
१८ डिसेंबर २०२५ रोजी वाकोडी घाट परिसरातील पुस नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी अंभोरे गेले असता, रेती माफियांनी त्यांच्यावर संघटितपणे हल्ला चढवला. परिस्थिती गंभीर बनल्याने त्यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत दोन राऊंड गोळीबार केला.जखमी अवस्थेतही न डगमगता त्यांनी दोन संशयितांना जागीच अटक केली. या धाडसी कारवाईने संपूर्ण पोलीस दलाचा सन्मान उंचावला होता.
जखमांवर मात; ‘सिंघम’ स्टाईल पुनरागमन
उपचारानंतर पूर्णपणे बरे होताच, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने अंभोरे पुन्हा महागावमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांच्या पुनरागमनाने अवैध वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, “कायद्याला आव्हान देणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही,” हा ठाम संदेश त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.
ठाणेदार धनराज निळे यांच्या नेतृत्वात धडक मोहीममहागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांत अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम उभी राहिली आहे. पोलीस ठाण्याच्या कामकाजात सुधारणा करून त्यांनी शिस्तबद्ध कारभाराची छाप उमटवली आहे.देशी हातभट्टी, जुगार, वाळू तस्करी अशा विविध अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई करून अनेकांना कायद्याचा धाक दाखवण्यात आला आहे. आता अंभोरे यांच्या पुनरागमनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे.
नागरिकांचा विश्वास वाढलाअंभोरे यांच्या धाडसी भूमिकेमुळे आणि पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अवैध धंद्यांना आता आळा बसेल,” असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.तसेच, प्रशासनाने ही मोहीम सातत्याने राबवून रेती माफियांचे जाळे पूर्णपणे नष्ट करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संपादकीय दृष्टिकोन :
महागावातील ही कारवाई केवळ एका अधिकाऱ्याच्या धाडसाची कहाणी नसून, कायदा व सुव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न आहे.धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि कठोर अंमलबजावणी यांचा संगम असेल, तरच अवैध साखळ्या तुटतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. आता प्रशासनाने हीच धार कायम ठेवणे गरजेचे आहे.

Post a Comment
0 Comments