Type Here to Get Search Results !

ये ग ये ग चिऊताई



आपल्या सर्वांच्या परिचयाची अन अगदी लहानपणापासून आपल्या मनाला भुरळ घालणारी ही चिमणी तिच्या पहाटच्या चिवचिवटाने निसर्ग सौंदर्य खुलवते व वातावरण प्रसन्न करते.आपण लहान असतांना आपली आई आपल्याला अन्नाचा पहिला घास भरवते. तो घास म्हणजे चिऊ जेवढा छोटा घास घेते ना..!अगदी तेवढाच असतो.आई आपल्याला घास भरवतांना गाण्याच्या माध्यमातून तेव्हा चिमणीला बोलावते,"ये ग ये ग चिऊताई"..! तेव्हापासून आपली आणि चिमणीची नाळ जुळते.

  चिमणी या पक्षांचे नर आणि मादी असे दोन प्रकार आहेत.त्यातील नराला आपण चिमणा तर मादीला चिमणी म्हणूया. साधारण यातील कुठलाही पक्षी दिसला तरी आपण चिमणीच शब्द वापरतो.लहान मुले 'चिऊताई' आली म्हणून नाचतात उड्या मारतात.व आपण मोठी माणसं सुद्धा अगदी सहज म्हणतो की चिमणी आली मात्र नर व मादी यांची स्वतंत्र ओळख आहे.त्यांच्या बाह्यअंगावरून किंवा दिसण्यावरून विचार केल्यास,नर चिमणीच्या कपाळाचा,शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी,कानाजवळ पांढरा,चोच काळी,कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात व मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. 

मित्रांनो,आपल्या अवती-भवती वावरणारी चिमणी ही मांसाहारी व शाकाहारी पण आहे.कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सूर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खाते.हंगामानुसार शेतात तिची मजाच मजा असते. छान स्वछंदीमनाने ती ज्वारी, मका, गहू या झाडांवर ती तिच्या चिमूकल्या पंखाने इकडून तिकडे उडते व एक एक दाना टिपते.ते नयनरम्य दृश्य बघून मन अगदी प्रसन्न होते.अन आपल्या चोचीत एक-एक दाना नेऊन घरट्यातील आपल्या पिल्लांना भरवते.ती स्वतःच घरटं स्वतः बनवते.गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधते. चिमणी ही साधारण चार ते पाच पिल्लाना जन्म देते अर्थात अंडे देते.ती फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची,त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते.अंड्यांच्या रंगात ठिकाणानुसार किंचित बदल दिसून येत असेल.नर-मादी घरटे बांधण्यापासून,अंडी उबविणे,पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात.चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते.

आपल्या मानव प्राण्याच्या अति हव्यास, तंत्रज्ञानाचा झापाट्याने होणारा बदल व वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी तांना दिसून येत आहे.हल्ली शहरांबरोबरग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ मोठी मोबाईल टॉवर उभारली जात आहे. या मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन,मोठमोठ्या इमारतीचे बांधकाम यामुळे घरट्यांच्या जागांची,अन्नाची अनुपलब्धता होतांना दिसून येत आहे.शहरांतील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे त्यांच्या इवल्याश्या जीवावर दुष्परिणाम होतांना दिसून येत आहे. त्यांचे स्वास्थ खराब होऊन अनेक चिमण्या दगावताहेत त्यातून या आपल्या सर्वांच्या लाडक्या चिमण्याची संख्या कमी होतांना दिसून येत आहे.

या वातावरणातील झालेल्या अपायकारक बदलामुळे,वन्यजीव व प्राणीमात्र यांचे जीवन धोक्यात आले आहे.सृष्टीचा एक घटक व ईशअंश म्हणून त्यांनाही आनंदाने व स्वछंदीमनाने जगण्याचा अधिकार आहे, म्हणून त्यांची सुरक्षा व जीवाची काळजी घेणे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी पक्षीमित्र कार्य करत आहेतच मात्र आपले सुद्धा वैयक्तिक कर्तव्य आहे की, सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली. सभोवतालचे वातावरण तापमानमुळे शुष्क झाले आहे. त्यामुळे,पाण्याचे साचलेले डोह नद्या नाले विहिरी कोरड्या होतांना दिसून येताहेत त्यामुळे पक्षांना पिण्यास पाणी मिळत नाही.ते पाण्यासाठी वणवण भटकतात. एवढेच नाही तर पाण्यावाचून त्यांचा जीवही जातो. मित्रांनो!आपल्याला तहान लागली तर स्वतः माठाजवळ जाऊन पाणी पितो मात्र हे चिमुकले जीव काय करतील? कारण उष्णतेने ही जमीन माऊली कोरडी झालेली असते. म्हणून आपण या चिमुकल्या जिवांसाठी एक परमेश्वराचं कार्य म्हणून, आपल्या घराच्या छतावर, बगीच्यातील झाडावर जलपात्र लावा त्यात आपल्या सवडीनुसार पाणी घाला खायला धान्य टाका.त्याठिकाणी चिमण्या येतील छान दाणे टिपतील अन तहानेने व्याकुळ झालेल्या चिमण्या निवांत होऊन पाणी पिऊन तृप्त होतील.अन हो ! हीच चिऊताई...!आईने आपल्या लेकरासाठी गाण्यातून घातलेली साद ऐकेल व दोन चिमुकल्या पंखानी दुडू दुडू उडत येईल.सकाळ संध्याकाळी तिच्या गोड सांगितमय आवाजाने,चिवचिवटाने आपल्या अवती भवतीचे वातावरण प्रसन्न करेल.

जागतिक चिमणी दिनाच्या शुभेच्छा...!

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ ता जि बुलडाणा 








Post a Comment

0 Comments