प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव शहरातील जुने श्री हनुमान मंदिर संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळणार
आहे. दि. १९ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत संगीतमय श्रीरामकथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.
महान तपस्वी संत तुळसीबन महाराज व प.पू. माधवानंद महाराज यांच्या कृपाशिर्वादाने हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहभर चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, कीर्तन, प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक चिंतनाची संधी उपलब्ध होणार आहे.
दररोज पहाटे काकड्याने दिवसाची सुरुवात होत असून सकाळच्या सत्रात ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात अभिषेक व पूजाविधी पार पडणार असून सायंकाळी हरिपाठाने वातावरण भक्तिमय होणार आहे. रात्रीच्या सत्रात हरिकीर्तन व जागर यामुळे भाविकांना भक्तीचा अनोखा अनुभव मिळणार आहे.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ह.भ.प. विमुदास महाराज (वाशिमकर) यांच्या ओजस्वी वाणीतील श्रीरामकथा प्रवचन. त्यांच्या माध्यमातून रामकथेतील आध्यात्मिक संदेश भाविकांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांच्या सहभागामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दररोज वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचन आयोजित करण्यात आले असून परिसरातील भाविकांसाठी ही एक मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ह.भ.प. विष्णुदास महाराज यांच्या उपस्थितीत सोहळ्याची सांगता होणार आहे.
या सप्ताहात भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे. महागांवात होणारा हा धार्मिक सोहळा केवळ एक परंपरा नसून सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि संस्कृती जपण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही मानले जात आहे.

Post a Comment
0 Comments