Type Here to Get Search Results !

शंभराले तीन कमी"



 शंभराले तीन कमी"हा साक्षरांसाठी अगदी साधा विषय असेल.शंभराले तीन कमी म्हटल्यापेक्षा सत्त्यांन्नव का म्हटलं नाही. असा अगदी साधा प्रश्न आपल्याला पडेल.हे अगदी स्वाभाविक आहे. या तीळमात्र शंका नाही परंतु, जवळपास दोन ते अडीच दशकाअगोदर आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साक्षरतेचा दर नगण्य होता. हल्ली साक्षरतेचे प्रमाण भारतच नाही तर संपूर्ण जगभर बऱ्या प्रमाणात वाढले आहे जवळजवळ लिहिता वाचता येण्याइतके शिक्षण सर्वजण घेत आहे. मात्र मागील पिढी अर्थात मागील दोन ते तीन दशका अगोदर ग्रामीण भागात महिला व पुरुष कामगार हे जवळजवळ पूर्ण निरक्षरच होते. त्यातील बोटावर मोजण्याइतके कुठेतरी पहिला दुसरा शिकलेला असायचा. तो दहा-बारा पर्यंत व्यवहार बोटावर मोजून करायचा मात्र,जेव्हा आकडा शेकडो किंवा हजारोंच्या घरात असायचा तेव्हा मात्र त्याचीही तारांबळ उडायची.तेव्हा गावातील जुना मॅट्रिक किंवा किमान सातवी- आठवी शिकलेल्या व्यक्तीकडून त्यांना त्यांच्या आठवड्याभराच्या कमाईतील मजुरीचे विभाजन करून घ्यावे लागायचे.

 खेड्यातील शेतमजूर कामगार महिला पुरुष हे शेतकाम, रस्तेकाम, पाईपलाईन खोदणे अथवा विहिरी खणून त्यातील माती मुरूम बाहेर काढून काढणे असे कठीणाहून कठीण कामे अगदी ताकतीने अन अंग मेहनतीने करायचे. साधारण दोन किंवा तीन जण किंवा त्याहून अधिक पंधरा ते वीस जण गट बनवून कामगार काम करायला घ्यायचे.याला गटाला गावाकडील भाषेत थोंगा म्हणतात अर्थात टीम वर्क. हे सर्वजण उधड्याने काम करायचे आताच्या भाषेत पॅकेजेस किंवा एका विशिष्ट रकमेत ठरलेले काम निश्चित वेळेच्या आत पूर्ण करून द्यायचे हे स्वरूप म्हणजे उधड्याने काम करणे,म्हणून मजूर-वर्ग हा जास्त प्रमाणात रोजगार हाती यावा म्हणून वेळ,काळ,ऊन तहान दिवस रात्र न बघता अगदी पशुवत काम करायचे. राब-राब राबायचे आणि ठरलेला पैसा हा मालकाकडून घेऊन एका व्यक्तीजवळ ठेवायचे.त्यांची रक्कम कधी कधी ही कामानुरूप शेकडो-हजारों रुपयांची असायची.ती रक्कम गावातील बाजाराच्या दिवशी अर्थात मंगळवारी समप्रमाणात विभाजन करून वाटून घ्यायचे.अगदी इमानीइतबारे एक-एक रुपयांच्या हिशोबामध्ये अफरातफर होत नसे कारण, हा सगळ्यांचा कष्टांचा पैसा असायचा आणि त्याहीपलीकडे महत्त्वाचा विषय म्हणजे एकमेकांचा एकमेकांप्रती असलेला विश्वास व प्रामाणिकपणा. हा खेड्यात प्रकर्षाने बघायला मिळायचा व अजूनही बघायला मिळतो.

 पुरुष कामगार मजूर वर्गाबरोबर महिला कामगारांचा सुद्धा गट अर्थात थोंगा बनलेला असायचा.या महिला कामगारांचे काम अर्थातशेतातील लावणी पेरणी,कापणी, मळणी, या स्वरूपाचे असायचे तर अशा या थोंग्यामध्ये आई सुद्धा कामाला जायची. कारण कौटुंबिक परिस्थिती ही जेमतेम होती. घरात खाणारे तोंड एकूण सहा जण होती. त्याचप्रमाणे वाढती महागाई त्यामुळे गरजा भागवण्यासाठी आई सुद्धा या महिलांच्या ठोंग्यामध्ये सहभागी होती.आमची काकू मंडळी यामध्ये सरला काकू नबुकाकू, बेबाकाकू याचबरोबर आईच्या इतर मैत्रिणी मैनाबाई, लक्ष्मीबाई, लिलाबाई,ध्रुपताबाई इत्यादी महिला कामगार व सोबत काही पुरुष मजूरसुद्धा होते त्यामध्ये सुनीलभाऊ,शंकरभाऊ,विठ्ठल भाऊ, बनराज भाऊ वगैरे होते.या सर्वांमध्ये सर्वजण अशिक्षित होते फक्त आई जुना पहिला-दुसरा वर्ग पास होती मात्र त्यातही तिला मोठा आर्थिक व्यवहार फारसा जमत नव्हता.कारण कधी कधी आठवड्याभराची रक्कम ही साठ ते सत्तर हजार रुपये पर्यंत जमा व्हायची, कारण एका एका थोंग्यामध्ये पंधरा ते वीस जण असायचे. त्यांदृष्टीने म्हणून एवढीरक्कम जमा व्हायची.जमा झालेली रक्कम सर्वांमध्ये समप्रमाणात विभागून घेण्यासाठी आमच्या अण्णाकडे यायचे. कारण अण्णा जुने मॅट्रिक तथा ग्रामसेवा सहकारी सोसायटीमध्ये सचिव पदावर कार्यरत होते अर्थात सर्व आकडेमोडच...! म्हणून अण्णाला ते विभाजन सहज सोपे होते व तेही अगदी तंतोतंत व अचूक करायचे.रुपये व पैशांचे सुद्धा..!

    आठवड्याभराची जमा झालेली रक्कम मजूरवर्ग बाजाराच्या दिवशी अण्णांकडे घेऊन आल्यावर,अण्णा सर्वांच्या मध्यभागी बसायचे. एकूण रक्कम भागेला मजूर वर्ग यातून अगदी साध्या व सोप्या पद्धतीने प्रत्येकांच्या वाट्याला किती रक्कम येईल हे सिद्ध व्हायचे.आपण सुशिक्षित वर्गांसाठी हे अगदी साधे सोपे वाटते, मात्र अडाणी व निरक्षर लोकांसाठी अवघड असते.ते गोंधळून जातात.कारण त्यांना फक्त ठळक व्यवहार कळायचा अर्थात चलनातील नोट समजायला सोपे जायचे.जसे की,पाच दहा वीस पन्नास शंभर पाचशे व एक हजार ह्या नोटा चटकन समजायच्या व हिशोब सुद्धा.मात्र आतील आकडे जसे की शहात्तर,सत्त्या ऐंशी हे कळायला अवघड वाटायचे. तेव्हा मात्र ते गोंधळून जायचे. म्हणून चलनातील नोटाप्रमाणे त्यांना समजून सांगावे लागेल. मग या नोटा खाली जमिनीवर ठेवून ते एकेक नोट वेगळी करून सांगावी लागे. त्या काळात पाचशे व एक हजाराची नोट या जास्त किमतीच्या नोटा होत्या. तर एक, दोन, पाच, दहा, वीस पन्नास व शंभर ह्या नोटा त्याचबरोबर पाच पैसे,दहा पैसे चाराआने आणि आठआने एक रुपयाचे नाणे होते.अश्या या एकूण रकमेतून विभागून प्रत्येक मजुराच्या हाती आलेली रक्कम ही अशीच असायची जसे की,उदारणार्थ दोन हजार पाचशे सत्यांन्नव रुपये.आपण हे सहज सांगतो की वरील रक्कम ही दोन हजार पाचशे सत्यांन्नव रुपये आहे मात्र, त्यांना मजुरांना सांगताना ते गोंधळायचे,तेव्हा अण्णा त्यांना ती रक्कम अगदी सुटसुटीत समजेल अशी विभागून द्यायचे. समजा पाचशेच्या पाच नोटा व सत्त्यान्नव रुपये विभाजण करतांना कधी-कधी पन्नासची नोट,वीसची एक किंवा दोन नोटा अथवा दहाच्या चार व चिल्लर सात रुपये त्यापैकी पाचची नोट व वरील दोन रुपये असे विभाजन करून सांगताना त्यांना सांगावं लागायचे की, अडीच हजार रुपये अन शंभराले तीन रुपये कमी...! अशी ही रक्कम तुमच्या वाट्याला आली आहे.कारण त्यांना ठळक नोटा समजायच्या जसं की, दहा वीस पन्नास शंभर मात्र सात्त्यान्नव समजत नसल्यामुळे सांगताना "शंभराले तीन कमी" असं सांगावं लागे,तेव्हा त्यांच्या लवकर लक्षात यायचं.त्याचप्रमाणे त्रेपन्न असल्यास पन्नास अन तीन असं सांगितलं तेव्हा त्यांच्या चटकन लक्षात यायचं. खरंच किती विलक्षण होतं.ना राब-राब राबून सुद्धा आपल्याला कमाईचे आठवड्याला किती पैसे येतील हे सुद्धा ते अगदी भोळ्या-भाबड्या भावनेने दुसऱ्यावर विश्वास ठेवून अगदी सहज घेतात. मनात कुठल्याही प्रकारचा अविश्वास अथवा शंका कुशंका बाळगत नव्हते.अहो एवढंच काय ! अण्णांकडे काही महिला ह्या अण्णांकडे कमाईतील पैसे सुरक्षित राहावे म्हणून जमा करून ठेवायचे.अण्णा त्या पैशांची अगदी तंतोतंत नोंद ठेवायचे.कधीच कुठल्याही प्रकारचा हिशोबात गोंधळ होऊ दिला नाही कारण,तो पैसा हा अगदी हातावरल्या काम करणाऱ्या गोरगरीब महिला मजुरांचा होता याची अण्णाना जाणीव होती. त्याचबरोबर अण्णा त्यांना बचतीचे महत्वसुद्धा समजून सांगायचे.

 अशाप्रकारे खेड्यातील साधे भोळे मजूर कामगार खूप अंगमेहनत करून बरीच कमाई करायचे. मात्र आपल्या वाट्याला आठवड्याला किती रक्कम आली. हे सुद्धा फारसं लवकर कळत नव्हतं.मात्र खेड्यातील लोकांचा एकमेकांप्रती असलेला विश्वास, प्रमाणिकपणा यातून कोणालाच फसवल्या जात नसे.कोणीही असो पैश्याचा हिशोब अगदी सुटसुटीत करून द्यायचे.मित्रांनो,सर्व हे निरक्षरतेतून घडतं,म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही. काळ बदलत चालला आहे.पहिल्यासारखी प्रामाणिक लोकं व पिढी राहिलेली नाही.मानवी स्वभाव बदलत आहे.एकमेकांना लुटण्याची व भ्रष्ट वृत्ती बोकाळली आहे म्हणून शिक्षणावर भर द्या.मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका.मुलांना शिक्षण देणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे.

श्री विनोद शेनफड जाधव

मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments