पिंपळगाव कौडा प्रतिनिधी:
उन्हाचा वाढता चटका, डोंगरावरील झाडांची पानगळ, आटलेले पाण्याचे स्रोत आणि पिण्याच्या पाण्यासाठी जीव तोडून भटकणारे वन्यप्राणी — असे विदारक चित्र नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात पाहायला मिळते.गावाच्या चोहोबाजूंनी डोंगररांगा असून येथे हरीण, ससे, तरस, लांडगे, बिबटे, मोर, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. मात्र, त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत सुविधा उपलब्ध नाहीत.
ही गरज ओळखून मा. सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे आणि त्यांच्या वन्यप्राणी सेवा समितीने गेल्या २० वर्षांपासून वन्यप्राण्यांची तहान भागवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी स्वखर्चाने अनेक पाणवठे तयार केले असून वन विभागानेही एक पाणवठा उभारला आहे.दरवर्षी मार्च ते जून अखेर लोकसहभागातून टँकरद्वारे या पाणवठ्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो.
आज काहळ्याच्या डोंगर पायथ्याशी, दावल मालिक बाबा दर्गा जवळील पाणवठ्यात चास स्टेट बँकेचे कॅशियर सतीश सोनवणे यांच्या स्वखर्चातून पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तुकाराम कातोरे (अध्यक्ष), राजेंद्र शिंदे (कार्याध्यक्ष), गोरख कातोरे (उपाध्यक्ष), सुखदेव वेताळ, हेमंत साठे, अभिषेक कातोरे, शैलेश बडदे, वनरक्षक अशोक गाडेकर, बाजीराव खोडदे, सखाराम येणारे, अंबादास रोहकले, रमजान शेख, संतोष ढवळे, रविराज साठे, नवनाथ ठोकळ, प्रदीप साठे आदी उपस्थित होते.या उपक्रमाचे कामरगाव व पंचक्रोशीतील वन्यप्रेमींनी कौतुक केले आहे.
असा मिळतो लोकसहभाग
तुकाराम कातोरे आणि त्यांचा मित्रपरिवार गावातील वाढदिवस, लग्नसमारंभ, डोहळेजेवण, वर्षश्राद्ध यांसारख्या कार्यक्रमांमध्ये मदतीचे आवाहन करतात. अनाठायी खर्च टाळून नागरिक या उपक्रमासाठी उदारपणे मदत करतात, आणि त्यातूनच हा उपक्रम यशस्वीपणे चालतो.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून इतर गावांनीही त्याचे अनुकरण करावे, असे मत मा. सरपंच वसंतराव ठोकळ यांनी व्यक्त केले.
वन पाटलांची नेमणूक करण्याची मागणी
वनसंपत्ती आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी गावोगावी पोलीस पाटलांच्या धर्तीवर वन पाटील पद निर्माण करून स्थानिक युवकांची नेमणूक करावी, अशी मागणी तुकाराम कातोरे यांनी शासनाकडे केली आहे

Post a Comment
0 Comments