Type Here to Get Search Results !

महागांव तालुक्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर? सिलेंडरसाठी ग्राहकांची धावपळ, कारवाईची मागणी



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर वाढल्याची गंभीर बाब समोर येत असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक हॉटेल, चहा कॅन्टीन तसेच लहान व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

आज सकाळपासून महागांव शहरातील गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अनेकांनी गॅसचे बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. एजन्सीकडून बुकिंग करून ओटीपी घेतल्याशिवाय गॅस दिला जाणार नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ग्राहकांना गॅस मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यातील काही हॉटेल व चहा कॅन्टीनमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे दिसून येते. विशेषतः तहसील कार्यालय परिसरातील काही व्यावसायिकांकडूनही घरगुती गॅसचा वापर होत असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही अशा गैरप्रकारांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

गुंज, धनोडा, फुलसंगी, हिवरा, मुडाणा, मोरथ, काळीदौलतखान आणि पोखरी या भागात काही जण घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून त्याचा काळाबाजार करत असल्याचेही आरोप पुढे येत आहेत. काही ठिकाणी घरगुती सिलेंडरमधील गॅस मोठ्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचीही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जिल्हा पुरवठा विभागामार्फत महागांवसह पुसद व उमरखेड परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवावी, तसेच घरगुती गॅसचा गैरवापर व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकाराकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments