प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे
महागांव :महागांव तालुक्यातील घानमुख ग्रामपंचायतीत प्रत्यक्षात विकासकामे न करताच शासनाच्या निधीतून बिले काढून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आला आहे. या प्रकरणात कनिष्ठ अभियंता प्रवीण मनोहर सलामे यांच्यासह इतर पाच जणांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत असून पंचायत समिती महागांवच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घानमुख येथील रहिवासी राम उत्तम जाधव यांनी २ मार्च २०२६ रोजी ‘सेवोत्तम लोकशाही दिन’ अॅपवर लोकशाही दिन अर्ज क्रमांक YTML२६०३१२६९४०३२८० द्वारे सविस्तर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत ग्रामपंचायतीत कोणतीही विकासकामे न करता शासनाच्या निधीतून बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
यापूर्वीही १२ ऑगस्ट २०२५ रोजी याच संदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पंचायत समिती महागांवच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात ग्रामपंचायत घानमुखचे तत्कालीन सचिव एस. पी. टारफे यांना दोषी ठरवून निलंबित करण्यात आले आहे. तसेच तत्कालीन सचिव अशोक हजारे यांचाही या प्रकरणात उल्लेख असून ते यापूर्वीच निलंबित असल्याची माहिती आहे.
दरम्यान पुढील विभागीय कारवाईसाठी पंचायत समिती महागांवच्या गटविकास अधिकाऱ्यांना एस. पी. टारफे आणि अशोक हजारे यांच्या विरोधात विभागीय खाते चौकशी सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रार कर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात कनिष्ठ अभियंता प्रवीण मनोहर सलामे यांच्यासह इतर पाच जण चौकशीत दोषी आढळल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे सलामे हे मागील सुमारे दहा वर्षांपासून पंचायत समिती महागांव येथे कार्यरत असून या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घानमुख ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरप्रकार उघड झाल्यानंतर स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments