जुन्या कापडांपासून अर्थात चिंध्या जोडून बनवलेलं पांघरून किंवा रजई म्हणजे गोधडी.खेड्यातील उत्कृष्ट कलेचा नमुना म्हणून गोधडीला ओळखले जाते.ही एक कलाच म्हणावी लागेल आणि तीही पूर्णतः"टाकाऊ पासून टिकाऊ...!"असा हा कलाप्रकार सर्वार्थाने गावाकडील महिला बनवतात.त्यासाठी त्यांचं पूर्ण समर्पण असतं.खेड्यातील असे एकही घर नाही की,त्या घरात गोधडी सापडणार नाही. यातील लहान मुलांसाठी बनवल्या जाणाऱ्या गोधडीच्या प्रकाराला पथरणी म्हणतात.पथरणीचा आकार साधारण दोन बाय तीन फूट असतो तर,गोधडी साधारण तीन फूट बाय सहा फूट आकाराची असते.काही महिला साडेतीन फूट बाय सहा फुटाचीही गोधडी बनवतात.
आजच्या काळात अनेक प्रकारचे पांघरून बाजारात उपलब्ध आहेत. डबल बेड,सिंगल बेडच्या मापाची ही पांघरुणं वेगवेगळ्या रंगातही उपलब्ध आहेत. हिवाळ्याच्या दिवसात अथवा सणांचे औचित्य साधून खास ऑफरवरही पांघरून बाजारात उपलब्ध असतात.मात्र वीस ते पंचवीस वर्षाअगोदर कपड्यांचा खूपच तुटवडा होता.खेड्यात फाटलेली कपडे शिवून,ठिगळ लावून घातली जायची.स्त्रिया लुगड्यांना दांड मारून नेसायच्या मग एवढी महागाची पांघरूण कोण खरेदी करणार?म्हणून तर गावाकडील आया जुन्या लुगड्यांच्या चिंध्यापासून गोधडी बनवायच्या.यासाठी आवश्यक साधने म्हणजे गोधडी शिवायला पांढरा दोरा,अडीच ते तीन इंच लांबीची सुई व घरातील व्यक्तीच्या वापरलेल्या कपड्यातील फाडून बनवलेल्या चिंध्या व एक अखंड जुनं लुगडं हे बाह्य आवरण लावण्यासाठी वापरल्या जायचे.गोधडी बनवण्यासाठी आई जुने कपडे की जे, तोटके, अपुरे झालेले असायचे त्यांना स्वच्छ धुऊन काढायची.त्या कपड्यांची हुका, क्लिप व बटण गावाकडे त्याला गुंड्याही म्हणतात.असे हे ब्लेडने किंवा कात्रीने कापून टाकायची.जेणेकरून ती गोधडीला टाके मारतांना अडथळा यायला नको.आई सर्व जुनी जाडी-भरडी कापड जमा केल्यावर त्यांना व्यवस्थित कापून घ्यायची. गोधडी शिवण्याअगोदर एक माप निश्चित करून घ्यायची.जुनं लुगडं घेऊन त्यांच्या चारी आयताकृतीपैकी तिन्ही बाजूने पूर्ण टाके मारून घ्यायची व एक बाजू मोकळी ठेवायची,कारण त्या मोकळ्या जागेतून कपडाच्या चिंध्या आतील बाजूत ढकलायची व व्यवस्थित अंथरून घ्यायची. एकावर एक अशी सुस्थितीत रचना करायची. कपड्यांचा दोन-तीन थर सेट करून रचना करायची.त्यामुळे गोधडी थोडी जाडसर व्हायची.लुगड्याच्या कव्हरच्या आतील बाजूमध्ये जुन्या कपड्यांचा व चिंध्यांचा थर व्यवस्थित पसरवल्यावर एक उघडी असलेली बाजू सुई दोऱ्याने पूर्ण टाके मारून घ्यायची.
लुगड्यापासून बनवलेल्या कव्हरच्या आतील बाजूमध्ये चिंध्या,कपड्यांचे तुकडे पसरवून झाल्यावर व चारी बाजूंनी टाके मारून झाल्यावर पसरलेल्या विना टाक्याच्या गोधडीवर जागोजागी काही जड वस्तू ठेवायची. त्यामध्ये घरातील लाकडी फळे,मुसळी,वगैरे जेणेकरून आतील चिंध्या व कपडे विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी लागे नाहीतर,गोधडी पूर्ण झाल्यावर काही ठिकाणी जाड तर, काही ठिकाणी पातळ होण्याची शक्यता असते.असं होऊ नये म्हणून काळजी घेतली जायची. अशाप्रकारे गोधडीची कच्ची रचना पूर्ण तयार झाली की,आई गोधडीच्या लांब बाजूला अर्थात डाव्या बाजूने अगदी कोपऱ्यापासून एकेक टाका मारायला सुरुवात करायची.जवळपास एकेक इंचावर हा टाका मारायची.आई दोन ते तीन सुया एक सोबत टाके मारायला घ्यायची.एक बाजू टाके मारून सरळ एका रेषेत पूर्ण झाल्यावर बाजूच्या सरळ रेषेत टाके मारायला दुसऱ्या सुईने सुरुवात करायची.सहा फुटाच्या या लांबी म्हणजेच बहात्तर इंच याप्रमाणे ढोबळमनाने बहात्तर टाके एका रेषेत मारायची.तर आडवी बाजू अर्थात तीन फुटाच्या बाजू मध्ये साधारण एक इंचाच्या अंतराने छत्तीस टाके मारायची.ढोबळमानाने जवळपास तीन बाय सहाच्या गोधडीसाठी आतील बाजूने दोन हजार पाचशे ब्यान्नव टाके होतात,तर बाहेरील आवरणाचा विचार केल्यास दोन हजार आठशे आठ टाके हे एका तीन बाय सहाच्या गोधडीसाठी मारावी लागतात आणि साडेतीन बाय सहा फूट आकाराच्या गोधडीसाठी आतील भागात तीन हजार चोवीस व बाहेरील आवरण पकडून तीन हजार दोनशे बावन्न टाके हे एक गोधडी शिवण्यासाठी मारावी लागतात.बापरे बाप!एवढी भयंकर तपश्चर्या आणि संयम एका या गोधडी तयार होण्यामागे असते. जेव्हा आपण याचा सूक्ष्म विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं.
सुई दोऱ्याने एक एक टाका मारताना आई सतत देवाचे भजन गुणगुणत असे,अर्थात ही गोधडी भक्तीच्या साधनेतून तयार व्हायची त्याचबरोबर मेहनत,कला,कौशल्य,संयमाची व समर्पणाचीसुद्धा जोड होती. ही गोधडी कुटुंबातील सर्वांच्या कपड्यातून बनवलेली असायची अर्थात एकसंघातून ममत्व हा गुणसुद्धा दिसून येतो. गोधडीला एक-एक टाका मारताना आईच्या बोटांना कितीतरी वेळेस सुई टोचत असेल,याचा अंदाज नाही.मात्र हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणे हेच ध्येय ती मनात ठेवत असे. एका गोधडीला एका दिवसात टाके मारून नाही झाल्यास साधारण दोन ते अडीच दिवस लागायचे तेव्हा मात्र अर्धवट गोधडीला एका कोपऱ्यात अगदी व्यवस्थित उचलून गोल घडी मारून गुंडाळून ठेवावी लागे.दुसऱ्या वेळेस टाके मारायला सुरुवात करताना शांततेत घडी उकलून सुरुवात करावी लागे.लुगड्याला अगोदर जर दांड मारलेला असेल तर,गोधडी ही पूर्ण शिवून झाल्यावर छान वेगवेगळ्या रंगाची व अतिशय आकर्षक दिसायची. चारी बाजूने टाके मारत मारत आल्यास आतील बाजूने सहाजिकच एका मागून एक असे अनेक आयात तयार होत असत. सर्वात आतील अगदी मध्यभागातील आयात हा एक बाय एक असा तयार व्हायचा. गोधडी दुरून पाण्याच्या चौरसाकृती उतरत्या बारवाप्रमाणे दिसायची.आतील बाजूने पायऱ्या उतरत जात आहे असं भासायचं.खूप आकर्षक अशी ही,गोधडी पूर्ण बनवून झाल्यावर रात्री अंगावर पांघरून घेण्यासाठी आम्ही रुसून बसायचो.साहजिकच ! लहानग्यांचा नंबर लागायचा.ही मायेची ऊबदार गोधडी पांघरायला अगोदर माझा किंवा माझ्या छोट्या ताईचा नंबर लागायचा.
या गोधडीला शुद्ध भाषेत पांघरून म्हणता येईल अथवा रजाई म्हणता येईल. काही ठिकाणानुसार व बोलीभाषेनुसार या गोधडीला विदर्भामध्ये गोधर,गोधरडी असंही म्हणतात.तर माझ्या गावात हिला "वाकळ" सुद्धा म्हणतात अर्थात मराठवाडा व विदर्भातील काही भागात गोधडीला वाकळही म्हणतात.काही आदिवासी ठिकाणी "जोडधडी" म्हणतात कारण ही, चिंध्या जोडून बनवलेली असते म्हणून साधारण हा शब्द प्रचलित झाला असावा.मित्रांनो ! काही विषय बोलायला गेलात तर अगदी साधे असतात.आपणही सहज बोलू की,नेमकं काय दडलय या चिंध्याच्या गोधडीत...! तर बघा!या गोधडीत आहेत तीन ते साडेतीन हजार सुई दोऱ्यांने आईच्या हाताने मारलेले टाके. टोकदार सुईचमुळे बोटांना झालेली दुखापत,समर्पण तासंतास एका ठिकाणी बसण्याचा संयम, समर्पण व तपश्चर्या..! घरातील सर्वांचे वापरलेले का होईना पण मायेचे उबदार कपडे,आईची कला, मेहनत कौशल्य या सर्व गोष्टींचा सुरेख संगम..!नुसती टाके मारून तयार झालेली ही गोधडी नसते तर,आभाळभर मायेतून तयार झालेली ही उबदार गोधडीची ज्या पिढीने अनुभूती घेतली.हिवाळ्याच्या दिवसात गार वातावरणात ऊबदार अशी गोधडी पांघरून मायेच्या कुशीत शांत झोप घेतली.त्यांच्या नक्कीच ! आभाळभर माया असलेली ही ऊबदार गोधडी कायम स्मरणात राहील.कारण ह्या कला सध्याच्या काळात लुप्त होताना दिसून येत आहे. शहरातच नाहीतर, खेड्यातही हल्ली गोधडी कोणी शिवतांना दिसत नाही.अगदी साठी-सत्तरीतील हौशी आजीबाई असतात की,ज्या नातवंडांसाठी पथरनी, गोधडी शिवतात मात्र,ही आजीबाईची पिढी हे जग सोडून गेल्यावर, येणाऱ्या पिढीला हा प्रकार डोळ्याने बघायला मिळणार नाही.अश्या ह्या कला फक्त आणि फक्त इतिहास जमा होऊन जाईल.कारण या धावपळीच्या दुनियेत एवढं समर्पण, त्याग,एका जागी बसून कार्य करण्याची जिद्द,तळमळ कुणाच्याही अंगी दिसत नाही.सर्व कसं अगदी फास्ट हवं.म्हणून बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रजई व पांघरूण उपलब्ध आहेत.बाजारात जा.पैसे द्या अन विकत घ्या.मात्र त्यामध्ये मायेचा ओलावा कुठे आहे?की जो, आपल्या आईने,आज्जीने बनवलेल्या आभाळभर मायेच्या ऊबदार गोधडीत दिसून येतो.
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा
Post a Comment
0 Comments