प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे
महागाव शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी दहनाचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी मंदिर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडविले.होळी दहनापूर्वी मंदिरात विशेष पूजन, आरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला. भाविकांनी कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि गावाच्या मंगलमय भवितव्यासाठी प्रार्थना केली.
“बजरंग बली की जय” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या सोहळ्यात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला. लाकडांचा कमीत कमी वापर करून तसेच रासायनिक पदार्थांना फाटा देत पारंपरिक पद्धतीने होळी दहन करण्यात आले. सण साजरा करताना पर्यावरणाचे जतन करणे हीच खरी परंपरा असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
प्रभागातील नागरिकांनी एकजुटीने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सजावट, सुरक्षाव्यवस्था आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. सामाजिक सलोखा आणि आपुलकीची भावना या निमित्ताने अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
या उपक्रमात ओम कुसंगवार, सॅम कदम, गजानन नरवाडे, रवी कदम, प्रवीण नरवाडे, सचिन भरवाडे, सोनू इंगोले, गणेश घोडे, सुनील कदम, विष्णू जाधव, महेश अण्णा, पांडू नरवाडे, श्रीकांत नागमोते आणि गौरव गायकवाड यांच्यासह अनेक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
होळी दहनानंतर नागरिकांमध्ये धुलीवंदन आणि रंगपंचमीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणांच्या माध्यमातून गावातील ऐक्य, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये जपली जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.प्रभाग ८ मधील हा मंगलमय सोहळा सामाजिक एकात्मतेचा आणि भक्तीभावाचा आदर्श ठरला आहे

Post a Comment
0 Comments