प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव शहरातील वार्ड क्रमांक ११ येथे धुलीवंदन/रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सणानिमित्त परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले.कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे यांच्यासह सचिन तायवाडे, रत्नाकर सांगडे, संजय सांगडे, दीपक तायवाडे आणि प्रिन्स सांगडे उपस्थित होते. सर्वांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरी केली.
यावेळी मान्यवरांनी धुलीवंदनचे धार्मिक व सामाजिक महत्व स्पष्ट केले. होळी व धुलीवंदन हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. समाजातील मतभेद, कटुता दूर करून प्रेम, बंधुता आणि ऐक्य वृद्धिंगत करण्याचा हा सण आहे. रंगपंचमीच्या माध्यमातून सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात, हीच आपल्या संस्कृतीची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना सण साजरा करताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. रासायनिक व त्वचेला अपायकारक रंगांचा वापर टाळावा. नैसर्गिक व हर्बल रंगांना प्राधान्य द्यावे. डोळे, कान आणि तोंडात रंग जाऊ नये याची खबरदारी घ्यावी. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर जबरदस्तीने रंग टाकू नये.
तसेच पाण्याची नासाडी टाळावी, अनावश्यक फुगे किंवा पाण्याच्या पिशव्या वापरू नयेत, वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
सणानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही नागरिकांनी घ्यावी, असे सांगण्यात आले. पर्यावरण जपत, सुरक्षिततेची काळजी घेत आणि सामाजिक सलोखा टिकवून धुलीवंदन साजरे करणे हीच खरी परंपरा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.वार्ड क्रमांक ११ मध्ये शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमातून एकात्मता, सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षणाचा आदर्श निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments