प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे
यवतमाळ : जिल्ह्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोखरी घाट परिसरात पुन्हा एकदा निलगायीची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून निलगाय (रोही) पकडली व धारदार शस्त्रांनी तिची हत्या करून अवयव कापून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाच्या गस्त व देखरेखीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास काही स्थानिक शेतकरी पोखरी शिवारातील घाट परिसरातून जात असताना त्यांना निलगायीचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता निलगायीच्या शरीराचे काही भाग कापून नेल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना देण्यात आली आणि अल्पावधीतच त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली.
मृतदेहाची पाहणी केली असता हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा नसून अज्ञात शिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक केलेल्या शिकारीचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. निलगायीला सापळ्यात अडकवून धारदार शस्त्रांनी तिची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर तिचे पाय, पोटातील काही अवयव तसेच मोठ्या प्रमाणात मांस कापून नेण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोखरी घाट परिसर हा वन्यजीवांच्या वावरासाठी ओळखला जातो. या भागात निलगाय, हरिण तसेच इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र शिकाऱ्यांच्या वाढत्या हालचालींमुळे या वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी काळी (दौ.) वनपरिक्षेत्राचे रेंजर सम्राट मेश्राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता त्यांनी सुरुवातीला या घटनेची माहिती नसल्याचे सांगितल्याचे समोर आले. त्यामुळे वनपरिक्षेत्रातील गस्त व्यवस्था आणि देखरेख यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, याच वनपरिक्षेत्रात यापूर्वीही निलगायीच्या शिकारीची घटना घडली होती. १६ एप्रिल २०२४ रोजी तीन निलगायांची शिकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळीही या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या प्रकरणात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला हस्तक्षेप करावा लागला होता.
त्या घटनेत सात आरोपींना अटक करण्यात आली होती, तर दोन आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली होती. त्या घटनेनंतर वनविभागाने गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याने त्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. शिकाऱ्यांना आळा घालण्यासाठी वनविभागाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, तसेच वनपरिक्षेत्रातील गस्त व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींकडून करण्यात येत आहे. पोखरी घाट परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Post a Comment
0 Comments