प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे
महागांव : तालुक्यातील गुंज, खडका, काळी (दौलत खान), धनोडा व दहिसावळी परिसरातील काही पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. पेट्रोल-डिझेल विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असतानाही ग्राहकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक असलेल्या सुविधांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दररोज शेकडो शेतकरी, वाहनचालक, व्यापारी आणि प्रवासी या पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी येतात. ग्रामीण भागातील अनेक गावांसाठी हेच पंप महत्त्वाचे ठिकाण ठरतात. मात्र प्रत्यक्षात या पंपांवर स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नाही, तसेच वाहनचालकांसाठी सावली किंवा बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे ग्राहक सांगत आहेत. त्यामुळे विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या कडाक्याच्या दिवसांत ही परिस्थिती अधिकच असह्य होते. पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, तर अनेक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात अशा प्रकारची स्थिती निर्माण होणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
याशिवाय अनेक पेट्रोल पंपांच्या परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र दिसून येते. कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छ परिसर आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी वाहनांमध्ये हवा भरण्याची मशीन बंद असते किंवा ती कार्यरत नसल्याची तक्रारही वाहनधारकांनी केली आहे.
ग्राहकांचे म्हणणे आहे की, पेट्रोल पंप चालकांना शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, हवा भरण्याची मशीन तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात काही पंप चालक या नियमांना सरळ केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
पेट्रोल-डिझेल विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जात असताना ग्राहकांना मूलभूत सुविधा न देणे ही सरळसरळ ग्राहकांची पिळवणूक असल्याचे मतही अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या प्रश्नावर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.
दरम्यान, गुंज, खडका, काळी (दौलत खान), धनोडा व दहिसावळी परिसरातील पेट्रोल पंपांची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या पंपांवरील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे आली आहे.
ग्रामीण भागातील ग्राहकांना मूलभूत सुविधा नाकारल्या जाण्याची ही स्थिती कायम राहिली तर नागरिकांचा संताप उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेळ न दवडता प्रशासनाने या प्रश्नात हस्तक्षेप करून पेट्रोल पंप चालकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वेळेत योग्य कारवाई झाली नाही तर नागरिकांकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ग्राहकांना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment
0 Comments