Type Here to Get Search Results !

महागांव शहरात सार्वजनिक ओपन स्पेसवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांची प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी




महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव शहरातील वॉर्ड क्रमांक १६ मधील नगरपंचायतीच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात वॉर्ड क्र. १६ मधील जवळपास ५० नागरिकांनी स्वाक्षऱ्यासह नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, वॉर्ड क्र. १६ मध्ये नगरपंचायतीच्या मालकीची गार्डनसाठी राखीव असलेली एक सार्वजनिक ओपन स्पेस आहे. या जागेला लागून जामा मशिद असल्याने दिनांक ११ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास काही स्थानिक व्यक्तींनी ही जागा संबंधित धार्मिक स्थळाची असल्याचा दावा करत त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी स्थानिकांनी या प्रकाराला विरोध दर्शविला. या प्रसंगामुळे शहरात जातीय तणाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या समन्वयामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (MRTP Act) नुसार नगरपंचायतीच्या नोंदीतील ‘ओपन स्पेस’ ही सार्वजनिक मालमत्ता असून ती कोणत्याही व्यक्ती किंवा धार्मिक संस्थेच्या खाजगी वापरासाठी वापरता येत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित जागेची तात्काळ मोजणी करून तिची हद्द निश्चित करावी. तसेच त्या ठिकाणी “नगरपंचायत महागांव सार्वजनिक मालमत्ता” असा फलक लावून संरक्षण भिंत किंवा कुंपण उभारावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भविष्यात कोणताही जातीय वाद निर्माण होऊ नये आणि शहरातील सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान या निवेदनावर नगरसेवक शैलेश कोपरकर यांच्यासह अमोल नरवाडे, प्रकाश जाधव, प्रणव व्यवहारे, धम्मानंद कावळे, निलेश भांगे, रमेश कदम, सुरज धोंडगे, राजेश काळे, श्रीकांत राऊत, श्रीकृष्ण नरवाडे, नामदेव सुरोशे, प्रतापसिंग चंदेल, किसन भांगे, प्रवीण गावंडे, गजानन नरवाडे, विलास पाटे, दीपक गाडबैले, सुशील नरवाडे, सूर्यकांत गाडबैले, अजय लिगते, संजय नरवाडे, बाळासाहेब डोंगरे, गजानन लिगदे, सूर्यप्रकाश कदम, अशोक इंगळे, दत्ता पाटे, अरुण काळे, संदीप इंगोले, रवी भांगे, ओम सुरोशे, कार्तिक बावने, कैलास पाटे, अमोल गाडबैले, संजय लिगदे आदींसह वॉर्ड क्र. १६ मधील सुमारे ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस स्टेशन महागांव तसेच नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments