Type Here to Get Search Results !

महागांव नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा विकासाच्या निर्णयांनी गाजली, घरकुल निधी, पाणीटंचाई आणि शहर विकासावर महत्त्वपूर्ण ठराव




प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव नगरपंचायतीची नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. विविध विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा करत अनेक महत्त्वाचे निर्णय सभागृहात घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. रंजना दीपक आडे होत्या, तर उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन पुढील दिशा निश्चित करण्यात आली.

सभेत सर्वप्रथम पंतप्रधान आवास योजना तसेच रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत डीपीआर क्रमांक १ ते ४ मधील वंचित लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने निधी जमा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांना निधी वेळेत मिळावा आणि त्यांचे घरकुल बांधकाम रखडू नये यासाठी विशेष ठराव सभागृहात मांडण्यात आला. हा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यासोबतच येणाऱ्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महागाव शहरातील पाणीपुरवठा योजनेची जुनी पाईपलाईन दुरुस्त करणे, विहिरींवरील इलेक्ट्रिकल कनेक्शनची कामे पूर्ण करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती व नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचेही ठरविण्यात आले.

दरम्यान, महागाव शहरातील वॉर्ड क्रमांक १ ते १७ मध्ये विविध विकासकामे राबविण्याचा निर्धारही सभागृहात व्यक्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने रस्ते बांधकाम, बंदिस्त नाल्या, सार्वजनिक सभागृह उभारणी तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विविध पायाभूत सुविधा उभारण्याचा समावेश आहे. या विकासकामांना लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सभागृहात स्पष्ट करण्यात आले.

महागांव शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने ही सर्वसाधारण सभा अत्यंत फलदायी ठरली. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करून नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा नगरपंचायतीचा प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या संदर्भात बोलताना नगराध्यक्ष सौ. रंजना दीपक आडे यांनी सांगितले की, महागांव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा तसेच आमदार किसनराव वानखेडे यांच्या माध्यमातून विविध विकास योजनांचा निधी महागांव नगरपंचायतीसाठी खेचून आणण्याचा ठाम प्रयत्न केला जाईल. शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहराचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे हे नगरपंचायतीचे मुख्य ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ महागांव शहराला मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्याने विकासकामांना गती देत महागांव शहराचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असल्याचेही नगराध्यक्षांनी यावेळी नमूद केले.


Post a Comment

0 Comments