Type Here to Get Search Results !

बाटली आडवी करण्यासाठी १६ एप्रिलला मतदान! भाजप शहराध्यक्ष निलेश भाऊ नरवाडे यांच्या पाठपुरवठ्याला यश



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी –विवेक नरवाडे

महागाव शहरातील प्रभाग १ मध्ये देशी दारू दुकानाच्या विरोधात उभारलेल्या लढ्याला आता निर्णायक टप्पा प्राप्त झाला असून, “बाटली आडवी” करण्यासाठी येत्या १६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निर्णयामुळे प्रभागातील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मतदान प्रक्रियेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष निलेश भाऊ नरवाडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. प्रभागातील महिलांच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासन स्तरावर सतत पाठपुरावा केला होता.

प्रभाग १ मध्ये देशी दारू दुकान व वाईन बार बंद करण्यासाठी स्थानिक महिलांनी जोरदार आंदोलन छेडले होते. “आडवी बाटली” हा नारा देत महिलांनी स्वाक्षरी मोहिम, निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडली होती. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मतदान प्रक्रियेद्वारे अंतिम निर्णय घेण्याचा मार्ग स्वीकारला.


दरम्यान, या विषयावर अनेक दिवसांपासून राजकीय हालचाली, आरोप-प्रत्यारोप आणि पडद्यामागील घडामोडी सुरू होत्या. मात्र आता मतदानाची तारीख जाहीर झाल्याने संपूर्ण प्रभागाचे लक्ष १६ एप्रिलकडे लागले आहे.

महिलांची भूमिका निर्णायक ठरणार

या मतदान प्रक्रियेत प्रभागातील महिला मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दारूमुक्त वातावरणासाठी महिलांनी एकजूट दाखवली तर “आडवी बाटली”चा विजय निश्चित मानला जात आहे.

प्रशासनावर पारदर्शकतेची जबाबदारी

मतदान प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पार पाडण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. कोणत्याही प्रकारच्या दबाव, आमिष किंवा गैरप्रकारांना आळा घालून लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

निर्णायक लढा अंतिम टप्प्यात

महागाव शहरात सुरू असलेला हा “दारूविरोधी लढा” आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, १६ एप्रिलचे मतदान हेच या लढ्याचे भवितव्य ठरवणार आहे.


आडवी बाटली की उभी बाटली? — याचा फैसला आता जनतेच्या मतातूनच होणार!


Post a Comment

0 Comments