Type Here to Get Search Results !

महागांवात दारू दुकानावरून मतदानात उलथापालथ



 उभी बाटली विजयी, महिलांचा संताप उसळला दवंडी वार्तापत्र भाकीत ठरले खरे


प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये देशी दारूचे दुकान बंद करायचे की सुरू ठेवायचे, या ज्वलंत प्रश्नावर घेण्यात आलेल्या विशेष मतदानात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर आला आहे. मोठ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मतदानात आडव्या बाटलीला तब्बल ६९ मते मिळूनही ‘उभी बाटली’ विजयी ठरल्याने शहरात संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावित्रीबाई फुले विद्यालयात पार पडलेल्या या मतदानात एकूण ७७ महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ६९ मते आडव्या बाटलीच्या बाजूने, तर केवळ ७ मते उभ्या बाटलीच्या बाजूने पडली. एक मत बाद झाले असून ते उभ्या बाटलीच्या बाजूने गृहीत धरण्यात आले. याशिवाय मतदानाला गैरहजर राहिलेल्या महिलांचे मतही उभ्या बाटलीकडे असल्याचे मानले गेल्याने अंतिम निकालात उभी बाटलीचा विजय घोषित करण्यात आला.

या निर्णयामुळे बहुमत असूनही पराभव अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः महिलांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

देशी दारूचे दुकान बंद व्हावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून महिलांनी आक्रमक भूमिका घेतली होती. घराघरांत जाऊन जनजागृती, प्रचार मोहीम, बैठका आणि रॅलीद्वारे वातावरण पेटवले गेले होते. नगराध्यक्ष रंजना आडे, नगरसेविका जयश्री नरवाडे, नगरसेवक सुरेश नरवाडे तसेच माजी नगरसेवक उदय नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकजुटीने लढा उभारला होता. त्यामुळे मतदानापूर्वी आडव्या बाटलीचा विजय निश्चित मानला जात होता.

याच पार्श्वभूमीवर आमदार किसनराव वानखेडे आणि भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात महिलांची भव्य रॅलीही काढण्यात आली होती. या रॅलीने वातावरण आणखी तापले होते. मात्र प्रत्यक्ष निकालाने सर्वच अंदाज धुळीस मिळाले.

निकाल जाहीर होताच महिलांमध्ये संताप उसळला. आमच्या मतांचा अनादर झाला, हा निकाल कसा लागला? असे सवाल उपस्थित करत अनेक महिलांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. काहींनी पडद्यामागे मोठे राजकारण झाल्याचा गंभीर आरोप करत या निकालाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली.

या निकालामुळे केवळ दारू दुकान सुरू राहणार की नाही, यापलीकडे जाऊन महागांवातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने त्यांच्या मनात असंतोष वाढला असून, पुढील काळात या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर “दवंडी वार्तापत्राने आधीच वर्तवलेले भाकित अचूक ठरले” अशी चर्चा शहरात रंगली आहे. निकालाच्या या नाट्यमय वळणामुळे महागांवात सध्या एकच चर्चा आहे — बहुमत असूनही पराभव कसा?एकूणच, या मतदानाने केवळ निकाल दिला नाही, तर अनेक प्रश्नही उभे केले आहेत.


Post a Comment

0 Comments