Type Here to Get Search Results !

कोट्यवधींची साधनसामग्री धुळखात; महागांवात सुविधा आहेत, पण सेवा नाही!


 

आपत्कालीन यंत्रणा ठप्प – नागरिकांच्या सुरक्षेशी प्रशासनाचा खेळ?

प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव (जि. यवतमाळ), 

शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली अत्याधुनिक आपत्कालीन सेवा साधनसामग्री महागांव नगरपंचायतीच्या आवारात अक्षरशः धुळखात पडून आहे. २०२२ नंतर नगरपंचायतीला मिळालेली रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, अग्निशमन मोटारसायकल तसेच गटर साफसफाईसाठीचा टँक यांसारखी अत्यावश्यक साधने आजही निष्क्रिय अवस्थेत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी ही साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती. आग, अपघात, आरोग्य आपत्कालीन परिस्थिती किंवा स्वच्छतेशी संबंधित समस्या तात्काळ हाताळता याव्यात, हा यामागचा उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात सुविधा आहेत, पण सेवा नाही अशी विचित्र व संतापजनक परिस्थिती महागांवात निर्माण झाली आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या वाहनांसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित चालक आणि कर्मचारीच नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोट्यवधींची यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरली असून, ती वापराअभावी निकामी होण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या करातून उभारलेली ही साधने अशा अवस्थेत पडून राहणे म्हणजे सरळसरळ सार्वजनिक पैशांची नासाडी असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

आपत्कालीन प्रसंगी वेळीच मदत मिळाली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागू शकतात. आग लागल्यास अग्निशमन वाहन असूनही ते चालवायला कोणी नसणे, रुग्णवाहिका असूनही ती वेळेवर उपलब्ध न होणे, किंवा गटर साफसफाईसाठी यंत्रणा असूनही स्वच्छतेच्या समस्या कायम राहणे – ही परिस्थिती प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

नगरपंचायत प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासन झोपेत आहे का? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ साधने खरेदी करून जबाबदारी संपत नाही, तर ती प्रभावीपणे कार्यान्वित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, हेही प्रशासनाने लक्षात घ्यावे लागेल.

आता तरी प्रशासनाने जागे होऊन तात्काळ प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करून या सर्व सेवा सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच येणार, असा इशाराही दिला जात आहे.महागांवात सध्या एकच चर्चा रंगली आहे — साधने आली, पण सेवा कधी सुरू होणार?


Post a Comment

0 Comments