Type Here to Get Search Results !

खेडलेझुंगेत ११११ विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमली हनुमान चालीसा ;

 



जन्मोत्सवानिमित्त ‘अभयवरद’ हनुमान परिसर भक्तीने रंगला ;रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचे आयोजन

प्रतिनिधी / गणेश ठाकरे , लासलगाव 

श्रीक्षेत्र खेडलेझुंगे येथील नक्षत्रवनातील १११ फुटी भव्य ‘अभयवरद’ हनुमान मूर्तीच्या साक्षीने गुरुवारी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

    या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ११११ विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण ठरले. हजारो कंठांतून एकाच वेळी उमटलेल्या जयघोषाने संपूर्ण खेडलेझुंगे नगरी दुमदुमून गेली. यावेळी खेडलेझुंगे येथील तिन्ही शैक्षणिक संस्थांचे शिक्षक, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा पिढीमध्ये सुसंस्कार आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संचार व्हावा, या उदात्त हेतूने श्री गुरुवर्य योगिराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थानच्या वतीने व गुरुवर्य रघुनाथ बाबा खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तुकाराम बाबा खेडलेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गुरुवर्य तुकाराम बाबा गुरुकुल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ११११ विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नागरिक सहभागी झाले होते.

केवळ आध्यात्मिक कार्यक्रमच नव्हे, तर सामाजिक भान जपत यावेळी नाशिक येथील नवजीवन रक्तपेढीच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. जन्मोत्सवाचे औचित्य साधून संस्थानतर्फे दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थानचे स्वयंसेवक, शिक्षक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

याच जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘गदा पूजन’ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रभू श्रीरामांच्या कार्यात शौर्याचे प्रतीक ठरलेल्या हनुमंतरायांच्या गदेचे पूजन करून समाजात धर्माधिष्ठित शौर्य जागृत करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी शंखनाद, मारुती स्तोत्र पठण व गदेला गंध-पुष्प अर्पण करून भावपूर्ण आराधना करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी ‘हिंदू राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी सामूहिक प्रतिज्ञा घेऊन राष्ट्ररक्षणासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


• आजच्या धावपळीच्या युगात तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची व अध्यात्माची गोडी लागावी, हाच या सामूहिक पठणामागचा उद्देश होता. येथील रहिवासी, तिन्ही संस्थांचे शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मन प्रसन्न झाले. - शिवनाथ मामा सदाफळ

Post a Comment

0 Comments