प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
विडूळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ नवी आबादी जिल्हा परिषद शाळेत अकोला येथील सेवा फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व निरोप समारंभ पार पडला. अध्यक्ष बाळासाहेब सरसमकर आणि मुख्याध्यापक गोपाल केंद्रे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक यशाचे कौतुक करण्यात आले. सेवा फाउंडेशनच्या 'शाळा वाचवा' अभियानांतर्गत वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बाळासाहेब सरसमकर यांच्या हस्ते गोल्ड मेडल, प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
सरसमकर यांनी विद्यार्थ्यांना पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून अभ्यास करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले. यावेळी पाचवीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सपना महाजन यांनी विद्यार्थ्यांना निरागसपणा जपण्याचा सल्ला दिला, तर विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश मिराशे, सुवर्णा बाकडे आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानामुळे परिसरात शाळेचे कौतुक होत असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती नवा उत्साह निर्माण झाला आहे. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार लाभला आहे.

Post a Comment
0 Comments