पिंपळगाव कौडा - कामरगाव (अहिल्यानगर प्रतिनिधी)
राज्यातील शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सिटू) यांच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना जिल्हा परिषद कार्यालय येथे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात संघटनेने नमूद केले आहे की, शालेय पोषण आहार योजना ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून या योजनेच्या अंमलबजावणीत कार्यरत कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प मानधनावर प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. मात्र त्यांच्या सेवेला कोणतीही कायमस्वरूपी हमी नसून त्यांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा किंवा इतर मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे जीवनमान अत्यंत कठीण परिस्थितीत जात आहे.
संघटनेच्या निवेदनात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना तात्काळ कायमस्वरूपी सेवा देणे, शासनाच्या किमान वेतन कायद्याअंतर्गत वेतन लागू करणे, तसेच कोणत्याही कारणाविना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रथा तात्काळ थांबवणे या बाबींचा समावेश आहे. याशिवाय शासनाने यापूर्वी जाहीर केलेली एक हजार रुपयांची मानधनवाढ त्वरित अंमलात आणावी, तसेच कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ), निवृत्तीवेतन व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी असेही सांगितले की, शालेय पोषण आहार कर्मचारी हे विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असूनही त्यांच्या हक्कांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नाही, तसेच कामाचा ताण वाढत असूनही त्यानुसार कोणतीही वेतनवाढ होत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.
तसेच, शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना कटिबद्ध असून, पुढील काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
निवेदन देताना शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या खजिनदार कॉ. छाया जाधव, कॉ. मोहन जाधव, कॉ. राहुल गायकवाड, तसेच कॉ. कल्पनाताई शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments