घरातील अर्थिंग तपासा स्मार्ट मीटरवर आरोप, पण खरा दोष वीजगळती चा? महागांव तालुका परिसरात वाढत्या वीजबिलांमागे तांत्रिक कारणांचा उलगडा
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी – विवेक नरवाडे
महागांव :अलीकडच्या काळात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिल वाढल्याच्या तक्रारी राज्यभरासह महागांव परिसरातही मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. मीटर बदलला आणि बिल दुप्पट झाले अशी भावना अनेक ग्राहकांमध्ये पसरली आहे. मात्र या संपूर्ण चर्चेकडे केवळ भावनिक नव्हे तर तांत्रिक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. कारण वीजबिल वाढण्यामागे स्मार्ट मीटर हा एकमेव घटक नसून, घरातील वीजगळती, कमकुवत अर्थिंग आणि न्यूट्रल लिकेज ही कारणे अधिक महत्त्वाची ठरत आहेत.
वीजपुरवठ्याची मूलभूत रचना समजून घेतली, तर या प्रश्नाचे उत्तर अधिक स्पष्ट होते. प्रत्येक घरातील वीजप्रवाह फेज व न्यूट्रल या दोन तारांमधून प्रवाहित होतो. फेजमधून वीज उपकरणात जाते आणि न्यूट्रलद्वारे परत येते. परंतु या प्रक्रियेत कुठेही तांत्रिक बिघाड झाला, विशेषतः अर्थिंग व्यवस्थित नसल्यास, वीजप्रवाहाचा काही भाग जमिनीकडे वाहू लागतो. हीच वीजगळती मीटरमध्ये नोंदवली जाते आणि त्याचा परिणाम बिलावर दिसून येतो.
ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र आहे. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे जुनी वायरिंग तशीच वापरली जाते. काळाच्या ओघात वायरचे इन्सुलेशन खराब होते, भिंतींमधून सूक्ष्म गळती सुरू होते. त्याचबरोबर अर्थिंगचा खड्डा कोरडा पडणे, तांब्याच्या पट्टीवर गंज येणे यामुळे अर्थिंगची कार्यक्षमता कमी होते. परिणामी, वीजप्रवाहाचा काही भाग सुरक्षित परत न जाता गळतीच्या स्वरूपात निघून जातो.
याशिवाय घरातील फ्रिज, गिझर, वॉशिंग मशीन, इस्त्री यांसारखी उपकरणेही गळतीची कारणे ठरू शकतात. उपकरणांमध्ये किरकोळ दोष असला तरी तो लगेच जाणवत नाही मात्र त्याचा परिणाम मीटरवर होतो. काही प्रकरणांत शेजारील घरांच्या न्यूट्रल वायरशी चुकीचा संपर्क येणे हीदेखील गंभीर बाब आहे, ज्यामुळे मीटर वेगाने चालतो.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरबाबत निर्माण झालेला अविश्वास काही प्रमाणात गैरसमजांवर आधारित असल्याचे दिसून येते. स्मार्ट मीटर अधिक अचूक पद्धतीने वीज वापराची नोंद करतात. पूर्वी दुर्लक्षित राहणारी वीजगळती आता स्पष्टपणे मोजली जाते. त्यामुळे ग्राहकांना बिल वाढल्याचा भास होतो प्रत्यक्षात मात्र वापर आणि गळती दोन्हींची अचूक नोंद होत असते.
यावर उपायही तितकाच स्पष्ट आहे. घरातील संपूर्ण वायरिंगची इन्सुलेशन रेझिस्टन्स चाचणी परवानाधारक इलेक्ट्रिशियनकडून करून घेणे आवश्यक आहे. मुख्य स्विच बोर्डमध्ये आरसीसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) बसविणे ही काळाची गरज ठरली आहे. हे उपकरण गळती आढळताच वीजपुरवठा तत्काळ खंडित करते, ज्यामुळे अपघात टळतात आणि बिलावरही नियंत्रण राहते.
अर्थिंग व्यवस्थेची नियमित देखभालही तितकीच महत्त्वाची आहे. उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला अर्थिंगच्या खड्यात पाणी, मीठ व कोळसा टाकून ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. तसेच, घरातील जड उपकरणांची वेळोवेळी तपासणी केल्यास लपलेली वीजगळती टाळता येते.
नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, सर्व तांत्रिक बाबी व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतरच मीटरवर शंका घ्यावी. आवश्यक असल्यास वीज वितरण कंपनीकडे मीटर तपासणीसाठी अर्ज करता येतो; मात्र मूळ कारण न शोधता केवळ मीटरला दोष देणे योग्य ठरणार नाही.
एकूणच, वाढत्या वीजबिलांचा प्रश्न हा केवळ तांत्रिक नाही, तर जागरूकतेचाही आहे. योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि आवश्यक उपाययोजना यांद्वारे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवता येऊ शकतो. स्मार्ट मीटरला दोष देण्यापेक्षा घरातील विद्युत व्यवस्थेकडे लक्ष देणे, हेच ग्राहकांच्या हिताचे ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments