पिंपळगाव कौडा– विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीची घोषणा संस्थापक अध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. राज्यभर संघटन विस्ताराच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी विविध पदांवर अनुभवी व कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या संघटनात्मक कामगिरीची दखल घेत, जिल्ह्यातील तीन प्रमुख कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मा. श्री. राजकुमार राऊत यांची राज्य संघटक, मा. श्री. भाऊसाहेब राऊत यांची राज्य प्रवक्ता, तर मा. श्री. भगवान राऊत यांची राज्य प्रसिद्धी प्रमुख या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या नियुक्त्यांमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघटन कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, समाज संघटन, जनजागृती आणि विस्तार कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष प्रा. प्रसाद गडकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. आदिनाथ भालेकर, जिल्हा सचिव श्री. अशोक गोरे तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांकडून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रसाद गडकर यांनी सांगितले की, “गेल्या दोन वर्षांत संघटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली असून, 14 तालुक्यांमध्ये शाखा स्थापन करण्यात यश आले आहे. राज्यातील हा पहिलाच जिल्हा आहे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर संघटन उभारणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या तीन नियुक्त्यांमुळे जिल्ह्याच्या कार्याला योग्य न्याय मिळाला आहे.”
पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “राज्य कार्यकारिणीवरील या तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट होईल आणि आगामी काळात समाज एकजुटीच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल होईल.”
या नियुक्त्यांमुळे विश्वकर्मा समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राज्यभर संघटना विस्ताराला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments