प्रतिनिधी – अहिल्यानगर
जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित व महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे आज विस्तृत बैठक आयोजित करण्यात आली. आमदार मा. सत्यजीतदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेष मोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील तसेच उपशिक्षणाधिकारी शिवगुंडे मॅडम उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपनेते आदरणीय रावसाहेब रोहोकले गुरुजी, कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, संघाचे पदाधिकारी संजय शिंदे, शिक्षक नेते संजय म्हस्के, युवा जिल्हाध्यक्ष शरद कोतकर, तसेच तालुका अध्यक्ष संजय दळवी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर मांडणी केली.
बैठकीदरम्यान अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांची संख्या कोणत्याही परिस्थितीत कमी न करता पूर्ववत ठेवावी, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त शाळा कार्यरत राहतील यासाठी नियोजन करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील शिक्षकांच्या निवड श्रेणी (Selection Grade) प्रस्तावांबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली. सध्या सर्व तालुक्यांमधील प्रस्ताव एकत्रित करण्याचे काम सुरू असून काही तालुक्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. उर्वरित प्रस्ताव तातडीने पूर्ण करून चालू महिन्याच्या अखेरीपर्यंत पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
याशिवाय हिंदी भाषा सूट संदर्भातील प्रलंबित अर्जांबाबतही चर्चा झाली. संबंधित शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
एकूणच ही बैठक सकारात्मक आणि फलदायी वातावरणात पार पडली. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन स्तरावर लवकरच ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments