प्रतिनिधी : दिव्य कर्णधार लासलगांव
कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार, दि. 13 व बुधवार, दि. 15 एप्रिल, 2026 रोजी 02 नविन व्यापारी धान्य खरेदी करण्यासाठी लिलावात सहभागी झाले असता जुन्या व्यापाऱ्यांनी त्यांना विरोध दर्शवत धान्य लिलावातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीस आणलेल्या गहु, मका व सोयाबीन या शेतीमालाच्या लिलावात सहभागी न होता आडमुठेपणाच्या धोरणाचा अवलंब करून लिलावात सहभागी झाले नाही व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. व्यापारी असोसिएशन सभासद नसल्याचे कारण देत नविन व्यापारी सहभागी करून घेतल्यास आम्ही जुने व्यापारी लिलावात सहभागी होणार नाही. नवीन व्यापाऱ्यांना सभासदही करून घेणार नाही या प्रकारची अडवणुकीची भूमिका घेतल्याने बाजार समितीसमोर मोठा पेचप्रसंग उभा केला. सदरच्या जुन्या व्यापाऱ्यांनी सदर बाजार समितीत संघटितपणे वर्षानुवर्ष व्यापार करून शेतकऱ्यांची लूट व फसवणूक करून करोडोच्या मालमत्ता कमावल्या. बाजार समितीमध्ये आम्ही शेतकऱ्याचे कैवारी असल्याचे खोटे सोंग आणून वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना वेड्यात काढून त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला कायम बाजार समितीमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक दिलेली आहे. तसेच बाजार समिती कर्मचाऱ्यांनाही लिलावात शिवीगाळ करणे, दमदाटी करणे. आम्हीच तुमचे पगार करतो, आम्ही जर बाजार समितीत आलो नाही तर तुमची बाजार समिती बंद पडेल.
तसेच तुम्ही जर आमचे ऐकले नाहीतर आम्ही आमची खाजगी बाजार समिती सुरू करू असे वेळोवेळी धमकावून आपलेच म्हणणे खरे तसेच आम्ही जे करू तेच योग्य आणि जे ठरवू तेच धोरण अशाप्रकारे बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळ यांना वेठीस धरले जात आहे व मनमानी करून त्यांचेच म्हणणे हे बाजार समितीमध्ये साध्य करून घेतले जात आहे. यामध्ये शेतकरी वर्ग किंवा गावातील जनतेचा कोणताही विचार केला जात नाही. अशा प्रकारची वारंवार मनमानी व्यापारी वर्गाकडून कायम केली जात आहे. नुकत्याच लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीवरून जातीयवादाचा मुद्दा उपस्थित करून आपापसातील वाद परंतु सदरचा वाद मुद्दाम बाजार समितीच्या कामकाजात उकरून काढून बाजार समितीच्या कामकाजात अडथळे / व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. तसेच सध्या ऑनलाईन पेमेंटचे नावाखाली शेतकऱ्यांचे पेमेंट रोख स्वरूपात अदा न करता आपल्या सोईनुसार संध्याकाळी केव्हातरी किंवा दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात आहे. यामुळे बाजार समितीत आलेला शेतकरी हतबल व निराश होऊन जात आहे. त्याला साधा चहा, नाश्ता, डिझेल किंवा घरी काही वस्तु न्यायची असल्यास काय करावे अशा चिंतेत तो सापडतो या अशा सुलतानी कारभारातून शेतकरी तसेच लासलगाव बाजारपेठेतील सामान्य दुकानदार होरपळून जात आहेत. यामुळे गावाच्या विकासाला सुद्धा खीळ बसलेली आहे. बाजार समितीतील लिलाव पुकारणे, सौदापट्ट्या लिहीणे, हिशेब पावत्या तयार करणे आणि आता चुकवत्या करणे ही अडत्याची जबाबदारी व खर्चीक असलेली कामे दबाव तंत्राने बाजार समितीवर ढकलून उलट बाजार समिती संचालक मंडळाचे संख्या बळाचा फायदा घेऊन बाजार समितीकडून मार्केट फी कमी करून घेतली आहे.
याउलट लासलगांव बाजार समितीचे उपबाजार असलेल्या विंचूर मार्केटमध्ये धान्याची आवक ही लासलगाव बाजार समितीतील आवकेपेक्षा जास्त होत आहे. तेथील लिलावाचे कामकाज हे लासलगांव पेक्षाही जोरात व वेळेत चालते. लासलगांव मार्केटमध्ये व्यापारी संख्या ही दिसायला जास्त असून धान्य खरेदी मोजकेच 2 ते 3 व्यापारीच मोठ्या प्रमाणात करतात, इतरांनी फक्त बाजार समितीतील प्लाॅट, सेलहाॅल, मोकळ्या जागा नाममात्र भाडे रकमेत अडकवून बिगर शेतमाल व्यावसायिकांना मोठ्या रकमेत भाड्याने देऊन मिळणाऱ्या भाडे रकमेतून स्वतःचे प्रपंच चालवित आहे. बरोबरच्या विंचुर येथील व्यापाऱ्यांनी अल्पावधीतच स्वतःच्या / भाडेतत्त्वावर जागा घेऊन प्रशस्त खळे व ऑफीस थाटले आहे. मात्र गेल्या 79 वर्षात येथील व्यापाऱ्यांना काहीच करता आले नाही. याशिवाय येथील काही व्यापारी परराज्यातील माल (गहु, बाजरी, ज्वारी, तांदूळ इ.) आणून विक्रीस ठेवीत आहे व स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी प्रमाणात खरेदी करीत आहे. ज्यामुळे बाजार समितीची लिलाव प्रक्रिया विशिष्ट लोकांच्या हाती एकवटलेली असल्याने ते त्यांची मनमानी करून बाजार समितीत कामकाज करतात व संपूर्ण यंत्रणेला वेठीस धरतात. येथील व्यापाऱ्यांना व्यापार करण्यापेक्षा राजकारण करण्यात जास्त रस दिसतो.
वास्तविक जे 02 नविन व्यापारी खरेदीस उतरले होते ते गेल्या 07-08 वर्षापासून थोरात नामक व्यापाऱ्याकडे पोट खरेदीदार म्हणून काम करीत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी पोट खरेदीदार म्हणून खरेदी केलेली चालते मात्र तेच खरेदीदार थेट खरेदीस उतरल्यावर आपले कमिशन बुडेल म्हणून यांच्या पोटात दुखते. जुन्या व्यापाऱ्यांच्या या प्रवृत्तीमुळे अनेक होतकरू व्यापाऱ्यांना येथे व्यापार करण्याची इच्छा आहे. मात्र यांच्या आडमुठेपणामुळे त्यांना व्यापार करण्यास अडचणी येत आहेत.
यामुळे आपणास सुचित करण्यात येते की, सदर होणाऱ्या गैरप्रकारांवर वेळीच आळा घालून बाजार समितीचे कामकाज शेतकरी हिताचे व पारदर्शक कसे करता येईल याबाबत मा. मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब तसेच बाजार समितीचे संचालक मंडळ व शासनाने वेळीच विचार करणे गरजेचे झाले आहे. अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांनी केली आहे

Post a Comment
0 Comments