दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
कराड : समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला “महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा सन्मान सोहळा कराड-सातारा २०२६” हा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. समाजात पुरस्काराने मान्यता मिळते त्यामुळे खरी ओळख होते असे प्रतिपादन समृद्धी पब्लिकेशनचे संचालक महाराष्ट्र प्रेरणा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी एन खरात यांनी मनोगत व्यक्त केले.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, प्रशासन आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.
कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथील उप लेखापाल सौ. वैशाली कांबळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “जीवन हे केवळ स्वतःसाठी न जगता समाजासाठी सत्कार्य करत जगले पाहिजे. आपल्या कार्यातून दुसऱ्याला प्रेरणा मिळाली तरच त्या जीवनाला खरे मूल्य प्राप्त होते. समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा सकारात्मकतेचा विजय आहे.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या सोहळ्यास सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. “थोडं तुझं थोडं माझं” तसेच “सखा माझा पांडुरंग” या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना शुभेच्छा देत अशा कार्यक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे सांगितले.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा. ॲड. तुषार शिवशरण यांनीही उपस्थित राहून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यांनी समाजातील परिवर्तनासाठी कार्यरत व्यक्तींनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राजश्री कोळी यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. “प्रेमाची गोष्ट २” तसेच “सावित्री जोतिबा फुले” मालिकेमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. त्यांनी सामाजिक कार्याला नेहमीच पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व आयोजक म्हणून प्रा. डॉ. बी. एन. खरात, संचालक – समृद्धी पब्लिकेशन यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी समाजामध्ये प्रेरणा, एकता आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कराड-सातारा परिसरातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संघटना, महिला बचतगट, कला क्षेत्रातील व्यक्ती तसेच युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून “महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा सन्मान सोहळा २०२६” या कार्यक्रमाने सामाजिक एकतेचा, प्रेरणेचा आणि सकारात्मक परिवर्तनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवला.

Post a Comment
0 Comments