Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी; शेतीकामे खोळंबली, जिल्हाधिकाऱ्यांनकडे साकडे



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी  विवेक नरवाडे 

  सध्या राज्याच्या विविध भागांत खरीप हंगामासाठी मान्सूनपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करत आहेत. मात्र, प्रशासनाच्या कडक धोरणामुळे पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

आर्थिक फटका आणि वेळेचा अपव्यय

बहुतांश शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र, प्रत्येक वेळी ट्रॅक्टर स्वतः पेट्रोल पंपावर घेऊन जाणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यातच प्रशासनाने पंपांना कॅनमध्ये इंधन न देण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. आधीच नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजावर आता डिझेलसाठी जास्तीचा खर्च करण्याची वेळ आली आहे.

प्रशासकीय धोरणांचा फटका पत्रात नमूद केल्याप्रमाणे, प्रशासनाच्या 'कठोर आणि अव्यवहार्य' धोरणामुळे पंप चालक कॅनमध्ये डिझेल देण्यास स्पष्ट नकार देत आहेत. यामुळे शेतातील ट्रॅक्टर इंधनाअभावी उभे राहत असून पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे 


तातडीने निर्णय घेण्याची विनंती

"शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पेट्रोल पंप धारकांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत आदेश द्यावेत," अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शेतकरी वर्गातून या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास खरीप हंगामावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments