प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
गोवंश तस्करीच्या संशयातून सुरू झालेला पाठलाग अखेर एका तरुणाच्या रक्तरंजित हत्येत संपला आणि संपूर्ण महागांव-उमरखेड परिसर सुन्न झाला. सुकळी (ता. उमरखेड) येथे शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या भीषण घटनेत बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दगडांनी ठेचून झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून रविवारी महागाव बंदचे आवाहन करण्यात आले.
एकीकडे गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे कायदा हातात घेणाऱ्या गुन्हेगारांची वाढती हिंमत — या दोन टोकांच्या संघर्षात एका तरुणाचा जीव गेला आणि संपूर्ण परिसरात अस्वस्थ शांतता पसरली. रस्त्यावर माणूस सुरक्षित आहे का? हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ-महागाव मार्गावरून एका बोलेरो पीकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गोवंश नेले जात असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती. बिजोरा टोल नाक्यावर वाहन संशयास्पदरीत्या वेगाने निघून गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला.
गजानन सुरोशे यांनीदेखील आपल्या वाहनातून त्या बोलेरोचा पाठलाग केला. रात्रीच्या अंधारात सुरू झालेला हा पाठलाग पुढे सुकळी गावाच्या दिशेने वळला आणि काही क्षणांतच वातावरण रक्तरंजित झाले. आरोपानुसार, बोलेरोमधील संशयितांनी अचानक वाहन थांबवून गजानन सुरोशे यांच्या वाहनावर दगड व लाकडांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. स्वतःचा बचाव करण्याआधीच सुरोशे गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. गावोगावी संतापाची भावना व्यक्त होत असून गोरक्षकाच्या हत्येला जबाबदार कोण? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
दरम्यान, या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची चर्चा असून पोलिसांकडून त्याची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर महागांवमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या हत्येचा तीव्र निषेध करत कडकडीत बंदची हाक दिली. रविवारी सकाळपासून कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. अनेक व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.
महागांवातील वातावरण दिवसभर तणावपूर्ण राहिले. चौकाचौकात नागरिकांच्या चर्चांना उधाण आले होते. गोवंश तस्करी इतकी बिनधास्तपणे कशी सुरू आहे?, रात्रीच्या वेळी महामार्गांवर नियंत्रण आहे का?, गुन्हेगारांना कोणाचा आशीर्वाद आहे का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागात गोवंश तस्करीचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळी काही दिवस गदारोळ होतो आणि नंतर सर्व शांत होते, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
गजानन सुरोशे हे बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. गोरक्षणाच्या कामात ते सातत्याने सहभागी होत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूमुळे वडद-मुडाणा परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महामार्गांवरून होणारी कथित गोवंश वाहतूक, त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणारे अपयश आणि त्यातून निर्माण होणारे हिंसक प्रकार यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची माहिती घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ तपासाच्या घोषणा नकोत; दोषींना तातडीने अटक झाली पाहिजे.
या घटनेमुळे सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी अशा घटनांमुळे समाजात तणाव वाढत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संयमाने आणि कठोरतेने दोन्ही बाजूंनी पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री रस्त्यावरून प्रवास करणे सुरक्षित राहिले आहे का? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. महामार्गांवर वाढती गुन्हेगारी आणि बिनधास्तपणे होणारी कथित तस्करी यावर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी पुढे येत आहे.
महागांव बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कायदा हातात न घेता तपासाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. तरीही परिसरातील वातावरण अजूनही तणावपूर्ण असून सर्वांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
गजानन सुरोशे यांच्या मृत्यूने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर ग्रामीण समाजातील वाढत्या असुरक्षिततेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे. गोवंश तस्करी, महामार्गावरील गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर आता केवळ बैठका नव्हे, तर ठोस कृतीची गरज असल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.
आता प्रश्न एवढाच —
या रक्तरंजित घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार का?
की काही दिवसांच्या संतापानंतर हे प्रकरणही फाईलीत गाडले जाणार?

Post a Comment
0 Comments