Type Here to Get Search Results !

महागांव परिसरात अवकाळीचा कहर



आमदार किसनराव वानखेडे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; तात्काळ पंचनाम्यांचे आदेश

दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

महागांव तालुक्यातील सवना आणि परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा मुळासकट उन्मळून पडल्याने संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला असून त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांच्या या कठीण प्रसंगात आमदार किसनराव वानखेडे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सवना परिसरातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी स्वतःशेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पीडित शेतकऱ्यांना धीर दिला. अनेक शेतकरी कुटुंबांचे संपूर्ण उत्पन्न केवळ केळीच्या पिकावरच अवलंबून असल्याने, त्यांचे झालेले नुकसान भरून काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार वानखेडे यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. "शेतकरी हा देशाचा कणा आहे. संकटाच्या या कठीण काळात शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण केली जाईल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती

या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार वानखेडे यांच्यासोबत तहसीलदार अभय मस्के, तालुका कृषी अधिकारी अंकुश टाकाळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, तलाठी अंकुश उईके, ग्रामसेवक संदीप पाटील उपस्थित होते.

तसेच परिसरातील प्रमुख नागरिक व शेतकरी बांधव, ज्यात दीपक आडे, सुरेश नरवाडे, शिवाजीराव देशमुख, निलेश नरवाडे, रमेश सावंत, शुभम गरूड, नितीन जाधव, विनायक सरसमकर, गोपालराव सरसमकर, श्रीराम बोंढारे, सुधीर देशमुख, अवधूत शिवारकर, पिंटू बेलखेडे, मारोतराव देशमुख, उदय करोडकर, किसनराव नरवाडे आणि ज्ञानेश्वर चव्हाण आदींचा समावेश होता, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments