प्रशासन हटवण्याच्या तयारीत मारेगावात तणावपूर्ण परिस्थिती
मारेगाव = येथील मार्डी चौकात शिवप्रेमींनी मध्यरात्री अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याची घटना समोर आली आहे. सकाळी ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी पुतळा हटविण्याची तयारी सुरू केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुतळा हटविण्याच्या निर्णयाला स्थानिक शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला असून, चौकात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच दंगा नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, संपूर्ण मारेगाव परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यातील चर्चेनंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. परिसरात तणाव कायम असला तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

Post a Comment
0 Comments