Type Here to Get Search Results !

भ्रष्ट कारभाराविरोधात एल्गार! महागांव येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक व अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे प्रतिनिधी, 

यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील नेहरू नगर मुडाणा येथील श्री शिवाजीराव मोघे प्राथमिक आश्रम शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील मुख्याध्यापक देवराव शिकारे आणि अधीक्षक संतोष विजय जाधव हे दोघे मिळून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक अडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक देवराव शिकारे आणि अधीक्षक संतोष जाधव हे दोघे संगनमताने शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडून त्यांचे हक्काचे मासिक वेतन (पगार) बँकेत जमा करण्यासाठी आणि वार्षिक वेतनवाढ (इन्क्रिमेंट) मंजूर करण्यासाठी सातत्याने पैशांचीलाचेची) मागणी करत आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

सामाजिक न्याय मंत्र्यांकडे दाद

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पत्रकार सुरज पवार यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री. संजय शिरसाट साहेब यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी संबंधित आश्रमशाळेच्या कारभाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी लावण्याची मागणी केली आहे.

"कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण

 करणाऱ्या मुख्याध्यापक देवराव शिकारे व अधीक्षक संतोष जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा."— सुरज पवार (पत्रकार)


चौकशीकडे सर्वांचे लक्ष

गोरगरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या आश्रमशाळेतच जर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असेल, तर संस्थेच्या दर्जावर याचा काय परिणाम होईल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आता या निवेदनावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट काय कारवाईकरतात आणि दोषींवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments