पावसाळ्यापूर्वीच रस्ते झाले मृत्यूचे सापळे! अर्धवट पूल, उखडलेले डांबरीकरण आणि खड्ड्यांच्या विळख्यात ग्रामीण भाग; नागरिकांचा प्रशासनावर संतापाचा उद्रेक
प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव तालुक्यात पावसाळ्याचे ढग अजून पूर्णपणे दाटायचे आहेत; पण त्याआधीच ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि विकासकामांची अवस्था पाहून नागरिकांच्या तोंडून संतापाचे शब्द बाहेर पडू लागले आहेत. तालुक्यातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्ते अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडले असून, काही मार्गांवर वाहन चालविणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. “रस्ता आहे की खड्ड्यांचा नकाशा?” असा संतप्त सवाल आता गावागावातून विचारला जात आहे.
महागांव तालुक्यातील माळेगाव, वाकोडी, मोरथ, धारमोहा, घारेगाव, शेनंद, सातघरी, माळवागत, टेंभी ते हिवरा फाटा या भागातील रस्ते आणि पुलांची अवस्था पाहिली तर विकासाच्या नावाने केवळ धूळफेक झाल्याचे चित्र स्पष्ट दिसते. काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण उखडून गेले आहे, तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचे अक्षरशः धिंडवडे निघत आहेत. दुचाकीस्वार दररोज घसरून जखमी होत आहेत, तर चारचाकी वाहन चालकांना रस्त्यावरून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे, अनेक रस्ते आणि पुलांची कामे सुरू करून ती महिनोनमहिने अर्धवट अवस्थेत टाकण्यात आली आहेत. काही ठिकाणी फक्त गिट्टी टाकून काम बंद करण्यात आले, तर काही ठिकाणी पुलांचे बांधकाम अपूर्ण ठेवून ठेकेदार गायब झाल्याची चर्चा आहे. परिणामी, धुळीचे ढग, उखडलेले रस्ते आणि अर्धवट बांधकामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक गावांतील विद्यार्थी सकाळी शाळेला जाताना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून कसाबसा मार्ग काढतात. पावसाळ्यात याच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः अडचणीत येते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आल्यानंतर अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. काही ठिकाणी रुग्णवाहिकादेखील पोहोचू शकत नाही. गंभीर आजारी रुग्णांना खाटेवर किंवा ट्रॅक्टरमधून वाहून न्यावे लागते. “विकासाच्या घोषणा मोठ्या, पण प्रत्यक्षात गावांचा संपर्कच तुटतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत.
शेतकऱ्यांची अवस्था तर आणखी बिकट झाली आहे. खराब रस्त्यांमुळे शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. वाहनांचे टायर फुटणे, पार्ट तुटणे आणि वेळेचा अपव्यय ही आता रोजचीच बाब झाली आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, “रस्त्यापेक्षा शेतातला बांध चांगला आहे.”
महागांव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. निधीअभावी कामे बंद असल्याचे कारण सांगितले जात असले, तरी नागरिक या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. “दोन आमदार, दोन खासदार आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांचे प्रतिनिधित्व असलेल्या तालुक्याची अवस्था अशी असेल, तर मग सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे?” असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमध्ये विकासाच्या घोषणा केल्या जातात, भूमिपूजनांचे नारळ फुटतात, मोठमोठे फलक लागतात; मात्र प्रत्यक्षात कामे अर्धवटच राहतात, अशी टीका ग्रामस्थ करत आहेत. “निवडणुकीच्या वेळी रस्ते आठवतात, नंतर जनता विसरली जाते,” अशी भावना नागरिकांमध्ये वाढताना दिसत आहे.
विशेषतः टेंभी ते हिवरा फाटा मार्गावरील कामामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. धुळीचे प्रचंड लोट उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वृद्ध, महिला आणि लहान मुलांना श्वसनाचे त्रास वाढत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
वाकोडी आणि माळेगाव परिसरातील पुलांचे काम अद्याप अपूर्ण असल्याने पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुसळधार पाऊस पडल्यास वाहतूक पूर्णपणे बंद पडू शकते. काही गावांचा संपर्क तुटल्यास अन्नधान्य, औषधे आणि अत्यावश्यक सेवांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील नागरिक आता प्रशासनाच्या आश्वासनांना कंटाळले आहेत. “दरवर्षी पावसाळ्याच्या आधी बैठका होतात, पाहण्या होतात, निवेदने दिली जातात; पण प्रत्यक्षात खड्डे तसेच राहतात,” अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आता प्रशासनाला इशारा दिला आहे. पावसाळ्यापूर्वी अपूर्ण पुलांची कामे पूर्ण करावीत, धोकादायक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि रखडलेल्या विकासकामांसाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या मते,
विकासकामांच्या नावाखाली फक्त कागदोपत्री कामे दाखवली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील जनता अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडताना दिसत आहे. “खड्ड्यात रस्ता शोधायचा की रस्त्यात खड्डा?” अशी परिस्थिती महागांव तालुक्यात निर्माण झाली आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांचे ढोल न वाजवता प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशी संतप्त मागणी तालुक्यातून होत आहे. अन्यथा यंदाच्या पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेचा संताप रस्त्यावर उतरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Post a Comment
0 Comments