Type Here to Get Search Results !

रेडगाव खुर्द ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत समितीची विकासकामांची क्षेत्रीय पाहणी

 



 प्रतिनिधी  गणेश ठाकरे लासलगाव

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ अंतर्गत ‘सुशासनयुक्त पंचायत’ या थीमवर आधारित कामकाजाची क्षेत्रीय तपासणी करण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी २५ मे २०२६ रोजी चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द ग्रामपंचायतीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगरच्या अप्पर आयुक्त (विकास) मा. श्रीम. सुषमा देसाई आणि नाशिक जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी श्री. चेतन खैरनार यांनी या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीच्या विविध कामांची सविस्तर पाहणी करून समाधान व्यक्त केले.

  तपासणी समितीने ग्रामपंचायत कार्यालय, आदर्श आपले सरकार सेवा केंद्र आणि त्याद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल सेवांची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP), स्थानिक शाळा, अंगणवाडी आणि गावात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यमापन केले. ग्रामपंचायतीचा कारभार आणि पारदर्शकता पाहून अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

    या संपूर्ण प्रक्रियेसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार, अति. प्रभारी प्रतिभा संगमनेरे मॅडम,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वर्षा फडोळ, चांदवडचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र  साबळे आणि विस्तार अधिकारी श्री. सुनिल बच्छाव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले 

या क्षेत्रीय भेटीदरम्यान रेडगाव खुर्दचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच चांदवड तालुक्यातील इतर ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी केंद्रचालकांनी उपस्थित राहून पडताळणीच्या कामात सर्वतोपरी सहकार्य केले.

   थेट क्षेत्रीय तपासणी यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल पंचायत समिती चांदवड आणि ग्रामपंचायत रेडगाव खुर्दतर्फे सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments