दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध आमदार होण्याची दाट शक्यता!
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी: विवेक नरवाडे
यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अत्यंत नाट्यमय आणि मोठी घडामोड समोर आली आहे. ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलल्यामुळे ही निवडणूक आता पूर्णपणे एकतर्फी होण्याची चिन्हे असून, शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध आमदार होण्याच्या मार्गावर असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची माघार?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यवतमाळ विधान परिषदेच्या या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आपले नामांकन पत्र मागे घेतले आहे. तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार नितीन भुतडा हे देखील आपले नामांकन पत्र वापस घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
केवळ प्रमुख पक्षच नव्हे, तर निवडणुकीच्या रिंगणात असलेले इतर तीन अपक्ष उमेदवारही आपले नामांकन अर्ज मागे घेणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.
नगरसेवकांचा 'लक्ष्मी दर्शनाचा' स्वप्नभंग!
विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य) मतदार असतात. दरवेळी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय चुरस आणि आर्थिक उलाढाल पाहायला मिळते. मात्र, सर्वच प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आणि निवडणूक बिनविरोध होण्याच्या स्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील नगरसेवकांचे 'लक्ष्मी दर्शन' घेण्याचे स्वप्न मात्र पूर्णपणे भंग पाडल्याचे चित्र दिसत आहे.
सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यास शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या गळ्यात बिनविरोध विजयाची माळ पडणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment
0 Comments