उन्हाळ्यातील मागील तीन ते चार महिने उष्णतेच्या दाहकतेचे चटके सहन करत सृष्टीतील सर्व सजीव घटक साधारण इंग्रजी महिन्यातील जून मध्ये पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात.या सृष्टीतील प्रत्येक सजीव घटक हा पाण्यावाचून जगू शकत नाही.उन्हाळ्यात पशुपक्षी पाण्याच्या भटकंतीसाठी कितीतरी मैल प्रवास करतात.पक्षी स्थलांतरित होतात.वनातील पक्षी जेथे पाण्याचा डोह-तलाव सापडेल तेथे वास्तव्य करतात.वन्य प्राणीसुद्धा पाण्याच्या शोधार्थ भटकंती करतात. त्यामुळे बिबट्या, वाघ, माकडे,अस्वल कोल्हे हे गावांकडे व शहरांकडे धाव घेताना दिसून येतात.त्याचबरोबर पाळीव प्राण्यांसाठी शेतकरी तथा पशुपालक पाण्याची व्यवस्था करतात.काही समाजसेवी संस्था पशु, पक्षी व प्राणीमात्रासाठी कृत्रिम पानवठे तयार करतात.यातून भूतदया दिसून येते. वनातील वृक्षवेली पाण्या वाचून सुकतात.वृक्षांची पानगळ होते.सभोवतालचे वातावरण अगदी भकास जाणवते.मात्र निसर्गाच्या ऋतुचक्रानुसार ऋतुंच्या रचनेप्रमाणे हे वातावरण सुद्धा आगामी ऋतूसाठी आवश्यक असतेच....!
उन्हाळ्याची दाहकता सहन करून शेतकरी राजा पेरणीपूर्व मशागत करून शेती पेरणीलायक करून ठेवतो व पावसाची आतुरतेने वाट पाहतो.पावसाच्या प्रतीक्षेचा काही काळ ओलांडल्यानंतर पावसाच्या आगमनास उशीर झाल्यास,दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात खेड्यापाड्यात पूर्वी "धोंडी धोंडी पाणी दे" हे गीत गावून गावातील मंडळी लोकनृत्य सादर करून निसर्गदेवाकडे पाण्याची मागणी करायचे.या अधिक मासाला ग्रामीण भाषेत धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात.हा महिना नेमकं पावसाळ्याच्या तोंडावर असतो, म्हणून त्या धोंड्यालाच ही भरघोस पावसाची मागणी असावी असे दिसून येते.अजूनही काही भागात ही लोकपरंपरा कायम आहे.गावातील शेतकरी, हातमजूर मंडळी कमरेला लिंबाच्या झाडाच्या फांद्या बांधायचे.डोक्यावर गांधी टोपी,हातात काठी घेऊन आभाळाकडे काठी करून दोन्ही हात जोडायचे.गोल रिंगण करून गल्लीमध्ये हलगी अर्थात दफड्याच्या तालावर "धोंडी धोंडी पाणी दे" नृत्य करत असतांना महिलावर्ग घरातून कळशी,हंडा अथवा लोटाभर पाणी आणून त्या नृत्य करणारे गावातील शेतकरी वर्ग,कामगार वर्ग तथा लहान चिमुकल्या मुलांच्या अंगावर धुलिवंदना सारखं शिंपडायच्या.हलगीच्या तालावरील हे नृत्य अतिशय मनमोहक वाटायचे.गावभर हलगी,दफडे वाजवणारा वादक सुद्धा देहभान विसरून त्या नृत्यांमध्ये सहभागी व्हायचा.काहिजण घरातून पसा दोन पसा भरून ज्वारी,गहू,डाळी सुद्धा त्यां कलाकारांना दान म्हणून द्यायचे.मात्र हे धान्य ते स्वतःच्या घरी घेऊन न जाता गावातील पारावर जमा करायचे व त्या दानस्वरूप धान्याचा सर्व गावातील लोक मिळून सार्वजनिक भंडारा करायचे. त्याचाच निसर्गदेवतेला नैवेद्य अर्पण करायचे .भरपूर पावसासाठी वरूण राजा अर्थात निसर्ग देवतेला साकडे घालायचे.देवांचे पाणी अर्थात वर्षा ऋतूंचे पाणी मागणे या मध्ये कुणाचाही वैयक्तिक स्वार्थ नसायचा.आणि नसतोच मुळी...!जात-पात धर्म पंथ याचाही लवलेश नव्हता, म्हणून सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी व्हायचे. अजूनही ही लोक परंपरा जिथे कायम आहे तेथे सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी होतात.
या लोकपरंपरेमागे श्रद्धा अथवा अंधश्रद्धा हा तर्क नव्हताच. होता तो फक्त आंतर्मनातील शुद्ध-भाव...! निसर्गस्वरूप भगवंतांच्या चरणी केलेली विनवणी..! तोही अशा कुठला शेंदुराचा देव नव्हता,किंवा दगडाचा देव नव्हता तर तो होता निसर्गदेव...!या देवतेला अर्थात आभाळाकडे हात जोडून शुद्ध अंतर्मनातून केलेली प्रार्थना होती.यामागे भाव होता तो मानवकल्याणाचा.मुक्या प्राण्यांच्या,वृक्षवेलींच्या हिताचा.ही परंपरा अजूनही काही भागात आहेच तर या "धोंडी धोंडी पाणी दे" म्हणणाऱ्या भोळ्या-भाबड्या गावकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून,आर्त हाक ऐकून जमिनीवरील कानाकोपऱ्यात त्याचा थेंब पडल्यास, या सृष्टीतील गवत,छोटी रोपटे,झूडपे वाढीस लागतात.बरसणारा हा पाऊस या सृष्टीवर नवचैतन्य घेऊन येतो.वृक्ष-वेली झाडी -झुडपे यामध्ये नवचैतन्य येऊन त्यावर,पक्षी वास्तव्य करतात.वातावरणात गारवा येतो. नद्या-नाल्यांना पूर येतो.विहिरी तुडुंब भरतात त्यामुळे खरिपातील पिकानंतर रब्बीतील अर्थात हिवाळ्यातील पिकांना त्याचा सहारा होतो. गुराढोरांना पिण्यास मुबलक प्रमाणात पाणी मिळते. शेताच्या बांधावर गवत उगवते.जंगल,वने,रस्त्यांच्या दुथर्फा छोटी-छोटी रानटी झुडपे,गवत वाढीस लागून भटक्या वन्य प्राण्यांना तथा पाळीव प्राण्यांना जसे की गाय, म्हैस,शेळी,मेंढी यांना लुसलुशीत हिरवेगार गवत खाण्यास मिळते.त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते पर्यायाने या प्राण्यांपासून मुबलक प्रमाणात शुद्ध दूध मिळते व आपल्या आरोग्यास ते हितकारक असते.एवढी किमया ही बरसणाऱ्या पहिल्या पावसात असते.
पहिल्या पावसाच्या आगमनामुळे सृष्टीतील बदललेले सकारात्मक नवचैतन्य मनाला उभारी देते.विशेषतः शेतकरी राजा जास्त सुखावतो.बघितलं तर,या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव घटक हा पहिल्या पावसासाठी आसुसलेला असतो.कारण त्याच्या बरसणाऱ्या थेंबांतून बदललेलं सृष्टी सौंदर्य मनात उच्च कोटीची प्रसन्नता निर्माण करते.नद्या-नाले तुडुंब वाहतात.ही सृष्टी जणू हिरवा शालू परिधान केल्याप्रमाणे भासते.वृक्षवेलीं वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी बहरतात.सुंदर फुलपाखरे झाड-वेलीवर आनंदाने फिरतात.पक्षी आनंदाचे गीत गातात.यामुळे सृष्टी सौंदर्यात अजून भर पडते.एवढी शक्ती या पहिल्या पावसाच्या आगमनामध्ये असते.आपण कितीही प्रयत्न करू देत की,आपल्या कितीही एकर शेतामध्ये पाईपलाईन करून पिकांना पाणी पोहचू देत ठिबक सिंचन करू देत स्प्रिंकलरने पाणी देऊ देत,मात्र या पावसाच्या पडणाऱ्या एक- एक थेंबाने या जमीन माउलीचा कानाकोपरा भिजतो.एक इंच सुद्धा जमीन तो कोरडी ठेवत नाही.शेताच्या बांधावर, वनात जंगलात पडलेल्या वाळलेल्या गवताच्या काडीला वनातील बियांना तो अंकुरित करतो व सृष्टी चैतन्य करतो.या पहिल्या पावसाने डोंगरदर्यावरून वाहणारे धबधबे,निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळे सुद्धा आकर्षक दिसतात.ते मनमोहक दृश्य बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.तेथे पावसात भिजतात.आनंद व्यक्त करतात. त्यामुळे पर्यटन स्थानाजवळील लोकांना रोजगार उपलब्ध होतो. गावाकडील लोकांना या गोष्टी फारशा विशेष नसतात कारण, ते सदैव निसर्गाच्या सानिध्यात डोंगर, दऱ्या, नदी नाल्यातील वाहणाऱ्या पाण्यासोबत वास्तव्यास असतात. मात्र शहरी भागातील लोकांना हे कौतुक वाटते म्हणून, ते या निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देतात.
अशाप्रकारे पहिला पाऊस हा निसर्गाचा आनंदोत्सव असतो.उष्णतेच्या दाहकतेने त्रस्त झालेला या सृष्टीतील प्रत्येक सजीव घटक सुखावतो.कोरडी धरणी माय हिरवाईने नटते. मातीचा सुगंध मनाला प्रसन्न करतो.लहान मुले पावसात भिजतात.नाचून आनंद व्यक्त करतात.पहिल्या पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू होते व त्या दिशेने तो सर्व शेती उपयोगी वस्तूंची जुळवाजुळाव करतो.हीच तर खरी पहिल्या पावसाच्या आगमनाची किमया असते.
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ ता जि बुलडाणा
Post a Comment
0 Comments