दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अपहरण व पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर अटक करण्यात महागाव पोलिसांना यश आले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
महागांव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३६२/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहितेतील (पूर्वीच्या भादंवि कलम ३६३, ३७६(२)(एन), ५०६) तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक लक्ष्मण कोकाटे (वय २५, रा. पोखरी) याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाने प्रयत्न सुरू केले. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानंतर १३ जून २०२६ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला १४ जून ते १८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याची चर्चा परिसरात होत असताना प्रभारी ठाणेदार सुनील अंभोरे यांनी पदभार स्वीकारताच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत आरोपीला अटक केल्याने फिर्यादी पक्षाला दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळाल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, प्रलंबित गुन्ह्यांमध्ये होत असलेल्या कारवायांमुळे महागाव पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांकडून प्रभारी ठाणेदार सुनील अंभोरे यांच्या कामकाजाचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment
0 Comments