Type Here to Get Search Results !

महागांव येथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकाला भूर्दंड; सोलर पॅनेल लावूनही आले वाढीव वीजबिल


दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 


महागांव (यवतमाळ):
महावितरण कार्यालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचा प्रकार महागांव येथे समोर आला आहे. येथील एका महिला ग्राहकाने घरात सोलर सिस्टीम आणि स्मार्ट मीटर बसवूनही, महावितरणने वेळेवर नेट मीटरिंग जोडणी (Net Metering Connection) न केल्यामुळे त्यांना प्रचंड वाढीव वीजबिल आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागांव येथील रहिवासी सौ. सुनिता सुभाष रामकर (ग्राहक क्र. ३८६५९०००७९५७) यांनी त्यांच्या निवासस्थानी १ मार्च २०२६ रोजी सोलर सिस्टीम बसवून घेतली होती. त्यानंतर महावितरण कार्यालयाकडून अनुभव नसलेले दोन कर्मचारी पाठवून स्मार्ट मीटर देखील बसवण्यात आले. मात्र, स्मार्ट मीटर आणि सोलर सिस्टीम यांच्यातील मुख्य 'नेट मीटरिंग'ची जोडणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलीच नाही.
अधिकारी देताहेत खोटी आश्वासने; ग्राहकांची फसवणूकनेट मीटरिंग जोडणी न केल्यामुळे ग्राहकाला अव्वाच्या सव्वा वीजबिल आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ग्राहक सौ. रामकर या महावितरणच्या कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. मात्र, महावितरणचे संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. "वीजबिल कमी करून देतो" असे केवळ खोटी आश्वासने अधिकाऱ्यांकडून दिली जात असल्याचा आरोप ग्राहकाने केला असून महावितरणकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे.

स्मार्ट मीटर केले डिस्कनेक्ट; न्यायाची मागणी


महावितरणच्या हलगर्जीपणामुळे थेट स्मार्ट मीटर डिस्कनेक्ट करण्यात आले आहे. या कारभारामुळे गरीब ग्राहकाचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.
या संदर्भात सौ. सुनिता रामकर यांनी उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता, विद्युत महावितरण कार्यालय, महागांव (जि. यवतमाळ) यांच्याकडे लेखी विनंती अर्ज सादर करून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. या अर्जाद्वारे त्यांनी वाढीव वीजबिल त्वरित कमी करण्यात यावे, बंद केलेले स्मार्ट मीटर तात्काळ सुरू करून देण्यात यावे आणि आपल्याला त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments