Type Here to Get Search Results !

महागांव: आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याला वाळू माफियांकडून जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेची मागणी



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

महागांव येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते प्रदीप पांडुरंग जगताप यांना वाळू माफियांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या धमकीमुळे उपोषणस्थळी आपला जीव धोक्यात असल्याचे सांगत, जगताप यांनी तहसीलदार आणि पोलीस स्टेशन महागांव येथे लेखी तक्रार दाखल केली आहे.

नेमके प्रकरण काय?

आज, दिनांक १७ जून २०२६ रोजी श्री प्रदीप जगताप यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयाच्या इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषण सुरू असतानाच वाळू तस्करांकडून त्यांना धमकावण्यात येत आहे. "तुम्हाला उपोषणस्थळावरून उचलून नेले जाईल," अशा आशयाची धमकी तस्करांनी दिली आहे. या प्रकारामुळे उपोषणस्थळी आपल्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असल्याची भीती जगताप यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाला इशाराया परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी ठेवावी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि काही अनुचित प्रकार घडल्यास, त्याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही उपोषणकर्ते प्रदीप जगताप यांनी प्रशासनाला दिला आहे.

आता या गंभीर तक्रारीची दखल घेऊन प्रशासन नेमकी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments