Type Here to Get Search Results !

यवतमाळ विधान परिषद निवडणूक



 साहेबराव कांबळे यांची माघार; दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब?

दवंडी वार्तापत्र महागांव  प्रतिनिधी विवेक नरवाडे 

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीची सर्व समीकरणे बदलली असून महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग जवळपास निर्विघ्न झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सुरुवातीला या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र होते. मात्र, साहेबराव कांबळे यांच्या माघारीमुळे विरोधकांचे गणित कोलमडल्याचे मानले जात आहे. त्यांच्या निर्णयामागे काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि राजकीय वास्तव यांचा प्रभाव असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, अपक्ष उमेदवार नितीन भुतडा यांच्या भूमिकेबाबतही उत्सुकता कायम असून त्यांच्या पुढील निर्णयाकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. तथापि, सध्याच्या परिस्थितीत निवडणुकीचे केंद्रबिंदू दुष्यंत चतुर्वेदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहेत.

राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांचे संख्याबळ, महायुतीची मजबूत राजकीय पकड आणि बदललेली निवडणूक परिस्थिती लक्षात घेता दुष्यंत चतुर्वेदी यांचे पारडे स्पष्टपणे जड झाले आहे. साहेबराव कांबळे यांच्या माघारीनंतर निवडणूक जवळपास एकतर्फी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून चतुर्वेदी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे.

साहेबराव कांबळे यांच्या माघारीने केवळ निवडणुकीचे गणित बदलले नाही, तर अनेक राजकीय इच्छुकांच्या आशा-अपेक्षांनाही धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत यवतमाळच्या राजकारणात आणखी काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच, साहेबराव कांबळे यांच्या माघारीने विधान परिषद निवडणुकीतील रंगत कमी झाली असली, तरी दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मात्र अधिकच प्रशस्त झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments