Type Here to Get Search Results !

महागांव नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे



चार महिन्यांपासून विकासकामे ठप्प , शहरात कचऱ्याचे साम्राज्य – शैलेश कोपरकर यांचा घणाघात 


दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

महागांव नगरपंचायतीतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून गेल्या चार महिन्यांपासून शहरात एकही मोठे विकासकाम सुरू नसल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शैलेश कोपरकर यांनी केला आहे . 

विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करणारे भाजपचे नेते आता शहरातील प्रश्नांवर गप्प का आहेत , असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे .

महागाव शहरातील विकासकामे पूर्णपणे ठप्प पडली असून रस्ते , स्वच्छता , पाणीपुरवठा , घनकचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप कोपरकर यांनी केला आहे .

 शहरातील नागरिकांनी विकासाच्या अपेक्षेने सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवला मात्र प्रत्यक्षात विकासाऐवजी शहराला अस्वच्छता , निष्क्रियता आणि अकार्यक्षमतेची भेट मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे .

विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक १ हा नगराध्यक्षांचा स्वतःचा प्रभाग असून याच प्रभागात नगरपंचायतीचे मुख्य कार्यालय आहे . मात्र या भागातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे . अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे त्रस्त झाले आहे . 

 नगराध्यक्षांच्या स्वतःच्या प्रभागातच स्वच्छतेची ही अवस्था असेल तर उर्वरित शहराची स्थिती काय असेल , असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे .

नगरपंचायत कार्यालयाच्या चारी बाजूंनी कचरा , घाण आणि अस्वच्छतेचे दृश्य पाहायला मिळत आहे . 

शहराचा कारभार ज्या कार्यालयातून चालतो त्या कार्यालयाच्या परिसरातच स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे . प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे हे जिवंत उदाहरण असल्याची टीका कोपरकर यांनी केली आहे .

घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केला जातो , विविध योजना राबविल्या जातात , स्वच्छ शहराचे दावे केले जातात मात्र प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वत्र उकिरडे तयार झाले आहेत . अनेक दिवस कचरा न उचलल्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे .

चार महिन्यांपासून विकासकामांचा एकही ठोस आराखडा दिसत नाही . काँग्रेसच्या काळात मंजूर कामे रखडलेली आहेत त्या कामांना प्रशासकीय कामकाज पूर्ण होऊन कमिशन साठी कामे करण्यात येत नाहीत . नवीन कामांचा पत्ता नाही आणि प्रशासन मात्र बैठका व घोषणांमध्येच व्यस्त असल्याचा आरोपही कोपरकर यांनी केला आहे . 

शहराच्या विकासासाठी आलेला निधी कुठे खर्च होत आहे , याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी जनतेला द्यावे , अशी मागणी त्यांनी केली .

महागाव शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी शहराला कचऱ्याच्या विळख्यात ढकलण्याचे काम सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे . विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता शहरातील नागरिकांना उत्तर देण्याची वेळ आली आहे . 

जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात लोकभावना तीव्र होत असून येत्या काळात जनआंदोलन उभारले जाऊ शकते, असा इशाराही कोपरकर यांनी दिला आहे .

नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ शहरातील कचऱ्याचे ढीग हटवून स्वच्छता मोहीम राबवावी , रखडलेली विकासकामे सुरू करावीत आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवावा , अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल , असे शैलेश कोपरकर यांनी स्पष्ट केले आहे .

Post a Comment

0 Comments