नागरिक आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास, नगरपंचायत प्रशासन लक्ष देणार का
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी: विवेक नरवाडे
महागांव शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार हा परिसरातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सध्या पडत असलेल्या पावसामुळे या बाजार मार्गाची कमालीची दुरवस्था झाली आहे. बाजार मार्गावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला डबक्याचे स्वरूप आले आहे.
या साचलेल्या पाण्याचा आणि चिखलाचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील विविध गावांमधून येणाऱ्या नागरिक, महिला आणि वृद्ध ग्राहकांना सहन करावा लागत आहे. भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या पाण्यातूनच पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, रस्त्याकडेला बसणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचेही यामुळे अतोनात नुकसान होतआहे.
दर आठवड्याला हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. "या गंभीर समस्येकडे महागांव नगरपंचायत प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का?" असा संतप्त सवाल आता तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील पाण्याची निचरा करावा आणि बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जाहीर मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments