Type Here to Get Search Results !

बीएलओमुखांच्या अपुऱ्या प्रशिक्षणामुळे ‘एसआयआर’ प्रक्रियेत मोठे अडथळे; २००२ च्या यादीत नाव असूनही मतदार त्रस्त!




दवंडी वार्तापत्र  महागांव  प्रतिनिधी  विवेक नरवाडे 

मतदार नोंदणी आणि पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रमुखांना योग्य व अपुरे प्रशिक्षण मिळाल्यामुळे ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेमध्ये अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः २००२ च्या मूळ मतदार यादीत कायदेशीररीत्या नाव अस्तित्वात असतानाही, सध्याच्या मॅपिंग प्रक्रियेत नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे.

प्रशिक्षणाचा अभाव आणि प्रशासकीय अनास्था

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक मतदार यादी अचूक असणे आणि योग्य मॅपिंग होणे आवश्यक आहे. मात्र, ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या बीएलओ प्रमुखांना अद्यापही या किचकट प्रक्रियेचे योग्य आणि शास्त्रीय प्रशिक्षण मिळालेले नाही.परिणामी, कागदपत्रांची पूर्तता करताना आणि पोर्टलवर डेटा अपडेट करताना प्रचंड गोंधळ उडत आहे. या अनास्थेचा थेट फटका सर्वसामान्य मतदारांना बसत आहे.

२००२ च्या जुन्या याद्यांचा मुद्दा ऐरणीवर

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या कुटुंबांचे व व्यक्तींचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत सुस्पष्टपणे नोंदवले गेलेले आहे, त्यांनासुद्धा मॅपिंगच्या वेळी विनाकारण अडचणीत आणले जात आहे. जुन्या नोंदी ऑनलाइन जुळवताना (मॅपिंग करताना) सर्व्हरच्या समस्या आणि कर्मचाऱ्यांचे अपुरे तांत्रिक ज्ञान यामुळे पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची किंवा तांत्रिक जाळ्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.

नागरिकांमध्ये संताप;

 तातडीने सुधारणा करण्याची मागणी

प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर निर्माण झालेला हा गोंधळ तात्काळ थांबवावा, सर्व बीएलओ प्रमुखांना तांत्रिक बाबींचे त्वरित व प्रभावी प्रशिक्षण द्यावे आणि २००२ च्या यादीतील जुन्या नोंदी ग्राह्य धरून मॅपिंगमधील तांत्रिक अडथळे तात्काळ दूर करावेत, अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments