दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती करून देण्यासाठी चक्क दहा हजारांची लाच उकळणाऱ्या महागांव येथील प्रभारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शकुंतला जयवंत इंगोले (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्याच घरात घुसून रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे महागांव तालुक्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे!
काय आहे प्रकरण?
महागांव तालुक्यातील इजनी येथील एका महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी शकुंतला इंगोले हिने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच याच योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेल्या संबंधित महिलेची निवड करण्यासाठी देखील तिने पैशांची मागणी केली होती.
पडताळणी दरम्यान तडजोडी अंती प्रथम हप्ता म्हणून ५ हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित ५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
रचला ‘चक्रव्यूह’ आणि आवळले आवडे!
तक्रारदाराने या प्रकरणी थेट एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने मंगळवारी सापळा रचत तक्रारदारास पंचासमक्ष आरोपीच्या महागांव येथील राहत्या घरी पाठवले. शकुंतला इंगोले हिने तिच्याच राहत्या घराच्या स्वयंपाकघरात तक्रारदाराकडून पहिला हप्ता ५ हजार रुपये स्वीकारला. अवघ्या काही क्षणातच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिला रंगेहात ताब्यात घेतले आणि व्हिडिओग्राफीच्या उपस्थितीत स्वयपाकघरातील गॅस ओट्याखालील पहिल्या कप्प्यात लपवून ठेवलेली ५ हजारांची लाचेची रक्कम जप्त केली.
कारवाईचा बडगा आणि पोलिसी खाक्या
या प्रकरणी महागांव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचखोराच्या घराची कसून झडती घेतली जात आहे.
ही धडक आणि यशस्वी कारवाई लाचलुचपतप्रतिबंधक विभाग, अमरावतीच्या पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासकीय कार्यालयांमध्ये आता एकाच चर्चा रंगली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास न घाबरता तात्काळ एसीबीकडे धाव घेण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments