Type Here to Get Search Results !

दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे 'समाजकार्य पंधरवाडा २०२६' चा समारोप



तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार  कळसकर 

26 ऑगस्ट 2026,भुसावळ ( जळगांव )

भुसावळ  : दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने “समाजकार्य पंधरवडा २०२६” चा समारोपीय कार्यक्रम शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावर्षी समाजकार्य पंधरवड्याची थीम “भारतीय संविधान : सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि मानवी प्रतिष्ठेचा पाया” ही होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास दरेगावे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण उपस्थित होते. विचारमंचावर प्रा. विजय पिंगळे, प्रा. तुळशीराम धुरंधर आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. आकाशसिंह राजपुत यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ गीताने करण्यात आली. यांनतर समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. आकाशसिंह राजपुत यांनी केले. त्यांनी समाजकार्य पंधरवडा २०२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत संविधानातील सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांचा समाजकार्याशी असलेला संबंध स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख अतिथी डॉ. सुधीर चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने संविधानाचा अभ्यास करून त्यातील मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारण्याची गरज व्यक्त केली. सामाजिक न्याय, समान संधी आणि लोकशाहीतील सक्रिय सहभाग यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. समाजकार्य पंधरवडा- २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे प्रमाणपत्र व पारितोषिकांचे वाटप विचारमंच वर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. देविदास दरेगावे यांनी समाजकार्य व्यवसाय हा संविधानिक मूल्यांवर आधारित असून समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या सक्षमीकरणासाठी समाजकार्यकर्त्यांनी संवेदनशीलतेने कार्य करावे, असे प्रतिपादन केले. समाजकार्य विद्यार्थ्यांनी संविधान समजून घेऊन समाजात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले. समाजकार्य पंधरवड्या दरम्यान आयोजित संविधान जनजागृती रॅली, सद्भावना दिन, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, सामाजिक जनजागृती उपक्रम आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. रवींद्र पाटील, प्रा. सुरज भगत, प्रा. चेतन बावस्कर, प्रा. निकिता राजपुत, महाविद्यालयातील कर्मचारीवृंद तसेच बी.एस.डब्ल्यू. चे विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन सुरडकर यांनी प्रभावीपणे केले, तर कु. ममता मोरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.



Post a Comment

0 Comments