Type Here to Get Search Results !

जेजुरीमध्ये सावकारी जाचाला कंटाळून हॉटेल मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न



  मयूर कुदळे  जेजुरी प्रतिनिधी 

      

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील एका हॉटेल चालकाने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि नातेवाइकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सदरील घटना ही मंगळवारी (दि. २४) सकाळचे सुमारास जेजुरी येथील आयुष हॉटेलच्या खोलीमध्ये घडली असून रवींद्र ऊर्फ बाळासाहेब दत्तात्रय पारखे (वय ६५) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पीडित व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी खासगी सावकारी करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केला असून,

 यातील तीन जणांना अटक केली आहे. सन २०१४ ते दिनांक २४/१२/२०२४ रोजी पर्यंत सासवड (ता. पुरंदर) येथे राहणारे मोहन ज्ञानदेव जगताप (रा. सोपानगर सासवड ) , अक्षय ऊर्फ शिटू चंद्रकात चौखंडे (रा. चौखंडे आळी सासवड ), संभाजी विश्वासराव जगताप (रा. त्रिशूल सोसायटी सासवड ), गिरीश राजेंद्र हाडके (रा.धान्य बाजारपेठ सासवड ), अक्षय ऊर्फ बाबू महादेव इनामके (रा. तपस्वी बिल्डिंग, ब्राह्मण आळी सासवड ) तसेच जेजुरी येथील अनिल विरकर आणि पंकज निकुडे यांनी बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करून व्याजाने व बेकायदेशीर भिशीचे मिळून एकूण १ कोटी ७१ लाख ८९ हजार रुपये रोख रक्कम देऊन, त्याचे व्याज म्हणून २ कोटी ५६ लाख २३ हजार रुपये देऊनही मुद्दल व व्याज देत नाहीत, या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करून मानसिक त्रास दिला. तसेच अक्षय ऊर्फ बाळू महादेव इनामके याने तर जबरदस्तीने पारखे यांची ब्रिझा गाडी (एमएच १२ एमडब्ल्यू ६५७७) हिसकावून घेतली . 

या सर्व प्रकाराला कंटाळून पारखे यांनी मंगळवारी (दि. २४) सकाळी हॉटेल आयुषमध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद रोहित रवींद्र पारखे यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार जेजुरी पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम ३९, ४५, ४६ व बी. एन. एस ३०८ (२), ३०९ (४), ३५२, ३५१ (२) (३), ३(५) प्रमाणे सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ दोन पोलिस पथके तयार करून गुन्ह्यातील महत्त्वाचे आरोपी मोहन ज्ञानदेव जगताप, संभाजी विश्वासराव जगताप आणि अक्षय ऊर्फ बाबू महादेव इनामके (रा. सासवड) यांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अक्षय ऊर्फ बाबू महादेव इनामके याच्याकडून ब्रिझा गाडी जप्त करण्यात आली आहे. या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ डिसेंबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडी दिली आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, भोर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप शिंदे, जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक महेश पाटील, हवालदार अण्णासाहेब देशमुख, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, संदीप भापकर, प्रसाद कोळेकर, सागर बहिरट या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे करत आहेत.

Post a Comment

0 Comments